पुणे : ‘पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून, खड्डे बुजविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे पाठपुरावा करावा’, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहेत.
‘खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ झाला असून, ज्या चौकात किंवा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. असे चौक आणि रस्त्यांची माहिती वाहतूक पोलिसांनी महापालिकेला द्यावी. खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात यावा,’ असे आदेश पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलिसांना दिले आहेत.
‘पावसाळ्यात शहरात कोंडी होती. वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना वाहतूक शाखेच्या प्रत्येक विभागातील रस्ते, प्रमुख चौकांत पडलेल्या खड्ड्यांची माहिती घ्यावी. ही बाब महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. महापालिकेतील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून खड्डे तातडीने बुजवून घ्यावेत. वाहतूक नियमनापुरते काम न करता ज्या भागात कोंडी होते, अशी भागांची पाहणी करुन वाहतूक कोंडीमागचे कारणे शोधावीत” असे आदेश शहरातील वाहतूक शाखेच्या सर्व विभागांना देण्यात आले आहेत.
महापालिकेशी समन्वय साधण्याच्या सूचना
शहरातील प्रमुख चौकात होणारया कोंडीची माहिती, तसेच याबाबतचा आढावा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. वाहतूक कोंडीच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खड्ड्यांबाबत महापालिकेकडून जे दावे करण्यात येतात. प्रत्यक्षात चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांचे निरीक्षण वेगळे असते. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांकडून माहिती घेेण्यात यावी. याबाबतचा अहवाल महापालिका अधिकाऱ्यांनिा सादर करावा. महापालिकेशी समन्वय साधून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात यावे. ३१ ऑगस्टपर्यंत वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई स्थगित करुन रस्त्यांची परिस्थिती, चौकांची रचना, अतिक्रमणे याबाबतची माहिती घ्यावी. ही माहिती महापालिकतील अधिकाऱ्यांना द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
