पुणे : विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भागासह पर्वती, कोथरूड, बंडगार्डन, छत्रपती शिवाजीनगर, पिंपरी-भोसरी परिसरातील नागरिकांना विस्कळीत वीजपुरठ्याला सामोरे जावे लागले.
झाडांच्या फांद्या पडून वीज वाहिन्यांचे नुकसान झाले. तर, काही ठिकाणी विजेचा कडकडाटामुळे, फिडर बॉक्स पाण्यात गेल्यामुळे वीज यंत्रणेत गुरुवारी दुपारी बिघाड झाला. त्यामुळे संपूर्ण शहरात नागरिकांना विस्कळीत वीजपुरवठ्याच्या समस्येला सामारे जावे लागले.
दरम्यान, वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असून, काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा महावितरणडून करण्यात आला. अतिउच्चदाब, उच्चदाब वाहिन्यांसह लघुदाब वाहिन्यांमध्येही बिघाड झाल्याची शक्यता असून, दुरस्तीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वीजग्राहकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.
कोथरुड
कुंदनगरी फिडरवर विजेच्या कडकडाटामुळे आकाशातील विजेला अटकाव करणारी यंत्रणा बाधित झाली. तसेच नांदेडसिटी अतिउच्चदाब वाहिनीत बिघाड झाल्याने कोथरूड परिसरातील वीज पुरवठा बंद झाला. मात्र, पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून, उपकेंद्रातील २ रोहित्र बंद असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
शिवाजीनगर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, खडकी, बावधन, बाणेर, शिवाजी हाऊसिंग सोसायटी या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने शिवाजीनगर परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. दरम्यान, विद्यापीठ वाहिनी सुरु करण्यात आली असून, उर्वरित बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
पर्वती
महावितरणच्या जुन्या पर्वती वीज उपकेंद्रातील फिडरवर झाड पडले. त्यामुळे परिसरातील वीज यंत्रणेत मोठा बिघाड झाला. फिडरवर पडलेले झाड हटवून वीजपुरवठा सुरु करण्याचे काम सुरु असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. तसेच प्रयेजा आणि मधुकोश वाहिनीच्या फिडर बॉक्स परिसरात पाणी साचल्याने वीजपुरवठा बंद आहे. खडकवासला, श्रवण वाहिनीमध्येही बिघाड झाला असून, हा बिघाड शोधण्यासाठी पाहणी करण्यात येत असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले.
बंडगार्डन
वडाचीवाडी येथे लटकत्या वीज वाहिनीवर झाडाच्या फांद्या पडल्या. त्यामुळे बंड गार्डन परिसरातील वीजपुरवठा बंद झाला. तर, वाडिया महाविद्यालय परिसरात पर्यायी मार्गाने सुरु करण्यात आल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
रास्तापेठ
कोंढवा, येवलेवाडी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या अतिउच्चदाब वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने रास्तापेठ विभागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले.
पिंपरी आणि भोसरी
पिंपरी-भोसरी परिसरातील ५८ रोहित्रे बंद पडल्याने परिसरातील नागरिकांचा विजपुरवठा खंडीत झाला. या परिसरात पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
तक्रारींसाठी संपर्क
वीजग्राहकांनी विजपुरवठ्या संबंधित तक्रारींसाठी महावितरणच्या १९१२, १८००२३३३४३५ आणि १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर, महावितरणच्या मोबाईल ॲपवर, किंवा ९१६७७७७७९१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
