पुणे : गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका हिंजवडी आयटी पार्क, वाकड, बालेवाडी परिसराला बसला. ‘वर्क फ्रॉम होम’वरही त्याचा परिणाम झाल्याने अनेक आयटी कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे महावितरणने त्या भागातील वीजपुरवठा करणारी यंत्रणा बंद केली. पावसाचा जोर ओसरल्यानंतर महावितरणने ही यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची मोहीम हाती घेतली. मात्र, यंत्रणेत पाणी गेल्याने त्यात बिघाड झाला. महावितरणकडून यंत्रणेची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असली, तरी संपूर्ण वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले नाही.

या वीज संकटाचा फटका रावेत, पुनावळे, किवळे, मामुर्डी, बिजलीनगर, मुकाई चौक, आदर्शनगर, देहूरोडचा काही भाग, साईनगर, आकुर्डी, निगडीचा काही भाग या परिसरातील ७० हजार ग्राहकांना बसला. याचबरोबर आयटी पार्कमधील टप्पा एकमधील साखरे वस्ती व पांडवनगर या भागातही विजेची समस्या होती. एकट्या वाकड भागात ४० हजार ग्राहक दोन दिवस अंधारात होते. मात्र, या भागातील वीजपुरवठा आता सुरळीत करण्यात आला आहे.

वीज संकटामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठाही बंद झाला. मोबाइल नेटवर्कही मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना मोबाइलवरून कॉल करणेही अवघड बनले. लिफ्ट बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, अपंग व्यक्ती, महिला आणि लहान मुलांना अडचणींचा सामना करावा लागला.

‘वर्क फ्रॉम होम’ला फटका

‘वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरून काम करण्यात अडचणी आल्या. पावसामुळे कंपनीने घरून काम करण्याची मुभा देऊनही काम करता येत नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे इन्व्हर्टरची सुविधा असेलच असे नाही. इन्व्हर्टर असेल, तरी तो ४ तास चालतो. तो बंद पडल्यानंतर नाइलाजाने काम बंद करावे लागते. वीजपुरवठा दीर्घ काळ खंडित झाल्याने घरून काम करणे शक्य नाही,’ असे एका आयटी कर्मचाऱ्याने सांगितले.

ऊर्जा राज्यमंत्र्यांकडे तक्रार

फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज या संघटनेने ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार केली. ‘गेल्या ७२ तासांहून अधिक काळ काही भागांत वीजपुरवठा खंडित आहे. लाखो नागरिक गंभीर संकटाचा सामना करत आहेत. हा केवळ वीजपुरवठ्याचा प्रश्न राहिलेला नसून, त्याचे व्यापक आणि गंभीर परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहेत. महावितरणकडून परिस्थितीबाबत स्पष्ट माहिती नागरिकांना उपलब्ध करून दिली जात नसल्याने संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे. काही कुटुंबांवर तात्पुरते स्थलांतर करण्याची वेळ आली आहे,’ असे संघटनेने म्हटले आहे.

तातडीने पावले उचलावीत

महावितरणने ग्राहकांचा वीजपुरवठा युद्धपातळीवर पूर्ववत करावा. नागरिकांना सध्याच्या परिस्थितीबाबत नियमित आणि पारदर्शक माहिती देण्याची आवश्यकता आहे. तसेच पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉइजचे सचिव प्रशांत पंडित यांनी केली.

वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पावले

पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा यंत्रणा बंद करण्यात आली. पाणी ओसरल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, पाणी शिरल्याने वीज यंत्रणा बंद पडली. ती दुरुस्त करण्य़ाचे काम सुरू असून, पाऊस असल्याने यात अडचणी येत आहेत. आतापर्यंत ९० टक्के वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा लवकरच सुरू होईल, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी दिली.