पुणे: सदाशिव पेठेतील अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज येथे महावितरणच्या वीजयंत्रणेला आग लागल्याने परिसरातील साडेपाच हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सोमवारी (२७ एप्रिल) खंडीत झाला.

महावितरणच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाजवळील उपकेंद्रातून निघणाऱ्या वीज वाहिनीवर बिघाड झाला. तसेच अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज येथील ऑईल टाईप रिंग मॅनेजमेंट युनिटला सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. त्यामुळे परिसरातील साडेपाच हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम सुरू केले. आग विझवण्यासाठी साडेतीन तासाचा कालावधी लागला. त्यानंतर वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात येत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. तर, बिघाड दुरुस्त करण्यासाठी काही वेळ लागणार असल्याचेही महावितरणच्या पर्वती विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

ऐन उन्हाळ्यात वीजग्राहकांना शॉक

उन्हामुळे घरातील तापमान वाढलेले असते. त्यामुळे पंखा, वातानुकुलन यंत्र (एसी), फ्रीज अशा वेगवेगळ्या विद्युत उपकरणांचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीतही वीजेच्या मागणीत वाढ होते. मात्र, वीजयंत्रणेमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, वीजबिल भरूनही वीजेच्या पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने वीजग्राहकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

उन्हामुळे वीजवाहिन्या, रोहित्रे, वीजखांबांवरील उपकरणे तापतात. त्यामुळे आग लागणे, ट्रीपिंग होणे, अशा घटनांमध्येही वाढ होते. परिणामी, वीज यंत्रणेचे नुकसान होते. वीजपुरवठा विस्कळीत होतो. अनेकदा परिसरातील वीजग्राहकांना वीजपुरवठा खंडीत होतो, काही वेळा सुरक्षेच्या कारणांमुळे वीज पुरवठा बंद ठेवावा लागतो. मात्र, देखभाल-दुरूस्तीची कामे तातडीने करण्यात येतात. प्राधान्याने पर्यायी मार्गांचा वापर करत वीजपुरवठा सुरळीत करण्यात येतो. अशा काळात मात्र वीजग्राहकांनीही सहकार्य करणे अपेक्षित असते, असे स्पष्टीकरण महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

आता देखभाल-दुरूस्तीचे काम सकाळीच

उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावेत, असे निर्देश महावितरणच्या मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

सध्या सकाळी १० ते दुपारी २ किंवा चार वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवत देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यात येत आहेत. यापुढे मात्र संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान देखभाल-दुरूस्तीचे काम करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. देखभाल दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे करताना सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे आणि संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे व प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळविण्यात येणार असल्याचेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.