Pune Heritage: Prabhat Road Redevelopment & History: अलीकडे कोंडीचे शहर अशीच पुण्याची ओळख सांगितली जाते. भरमसाट गर्दी आणि पुनर्विकासाची गजबज. आता विकासाची सूज वाढायलाही जागा नाही. पण, यावर मार्ग शोधणार नाहीत, ते विकासक कसले? ऐसपैस अंगण असलेल्या देखण्या बंगल्यांची जागा अपार्टमेंटने घेतली. आता त्याही पुरेशा नाहीत, म्हणून मोठमोठे टॉवर नि इमारतींचे वीस-वीस मजले रचले जात आहेत.

पुनर्विकासाच्या या रेट्यात प्रभात रस्त्याच्या १५ गल्ल्यांचा जीवही आता घुसमटू लागला आहे. हिरवागार, स्वच्छ नि कधी काळी विविध क्षेत्रांतील प्रज्ञावंतांची मांदियाळी असलेल्या या रस्त्यावर पुनर्विकासाची नवी प्रभात होत आहे.

प्रभात रस्त्यावर घर, हा पुणेकरांसाठी प्रतिष्ठेचा विषय. हे आकर्षण अजूनही कायम आहे. पुण्यातल्या मध्यवर्ती पेठांमधून मोकळा श्वास घेण्यासाठी इथे येणाऱ्यांची संख्याही मोठीच. इराणी कॅफेत बसून चहा नि बन मस्क्याबरोबर गप्पांच्या मैफली रंगलेल्या दिसतात. दोन-चार दुचाकी आणि एक-दोन चारचाकी वाहने लागली, की पार्किंग ‘फुल्ल.’

विधी महाविद्यालय रस्त्यापासून थेट डेक्कन जिमखान्याला जोडणाऱ्या या रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे. यात नवीन काही नाही; पण मोकळा श्वास घ्यायला म्हणून इथे आलेल्या नि इथेच वसणाऱ्या पुणेकरांच्या सहनशीलतेची ही कसोटीच. आजूबाजूला सुरू असलेली बांधकामे, त्यांचा रोजचा आवाज आणि त्या कल्लोळात निळ्या पत्र्यांआड दडलेल्या आठवणी. महानगरांच्या रचनेत आठवणींची संस्कृती नसते, इथे केवळ विकास नि पुनर्विकासाची धडपड करावी लागते, हे कटू सत्य पुण्याला पचवावेच लागते.

डेक्कनपासून सुरुवात केली, की प्रभात रस्त्याच्या तोंडालाच असलेली प्रभात लॉजची इमारत आता निळ्या पत्र्याआड गेली. प्रभात लॉज पाडून नवी इमारत उभी राहणार आहे. भारतीय सिनेमाचा पडदा गाजवणाऱ्या प्रभात फिल्म्सचे किंवा राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात ‘एफटीआयआय’ला ये-जा करणारे दिग्गज कलाकार इथेच उतरायचे.

आता रस्त्याच्या दहाव्या गल्लीत असलेले स्वरूप हॉटेल त्यांच्या नव्या मुक्कामाची जागा म्हणून प्रसिद्ध. जुन्या प्रभात लॉजसमोर असलेली रिगल बेकरी या बदलांची साक्षीदार. लॉजच्या जवळ दगडी बांधकामातील विमलाबाई गरवारे प्रशालेची देखणी इमारत. आता स्पर्धा परीक्षांपासून दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा इथे होतात. रस्त्याच्या सुरुवातीलाच असलेल्या या शाळेने अनेक ‘स्कॉलर’ घडवले.

थोडे पुढे आले, की पाच दशकांहून अधिक काळ अस्सल मराठमोळ्या पदार्थांची मेजवानी देणारे वृंदावन. आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये फ्रेंच, इटालियन रेस्टॉरंट, कॅफे सुरू झालेत; पण ‘वृंदावन’ची सर त्यांना नाही, असे हमखास सांगितले जाते. थोडे पुढे आतल्या बाजूला टिळक टँक. उन्हाळा आला, की इथे पुणेकरांची गर्दी होणारच. पोहून आल्यावर भूक भागविण्यासाठी जवळच ‘भाडाईत’, ‘काटा किर्र’मध्ये मिसळ, हे समीकरण. ‘दर्शन’मध्ये छोले-भटुरे आणि बीन्स ऑन टोस्ट खायलाही गर्दी.

चालण्याच्या हक्काच्या जागा या रस्त्यावर आजही दिसतात. कमला नेहरू पार्क आणि हिरवाई ट्रॅकमध्ये लहान-थोरांची कायम गर्दी असते. समोर असलेली खाऊगल्लीही गजबलेली दिसते. पूर्वी कमला नेहरू पार्क एरंडवणा पार्क म्हणून ओळखले जायचे. नावांच्या बदलाची ही आठवण पुण्याच्या विस्ताराची खूण म्हणून महत्त्वाची.

ऐसपैस जागांच्या जोडीला दर्जेदार शाळांमुळे या रस्त्याला आपोआपच पहिली पसंती मिळते. श्यामराव कलमाडी हायस्कूल, रस्त्याच्या पंधराव्या गल्लीत असलेली सिम्बायोसिस शाळा नि मघाशी आलेली विमलाबाई गरवारे प्रशाला, अशा शिक्षण संस्था दर्जेदार शिक्षणाची हमी देणाऱ्या. याच रस्त्यावर लहानग्यांना शिक्षणाबरोबरच शरीर-मनाच्या संवादाचे धडे देणारे बालरंजन केंद्रही. पुण्यात घडणारे पहिले प्रयोग अधिक चांगल्या नि वेगळ्या प्रकारे या रस्त्यावर अवतरतात. प्रभात रस्त्यावरील बालस्नेही पोलीस चौकी हे त्याचेच उदाहरण. चित्रांनी रंगवलेली भिंत पाहून ही खरेच पोलीस चौकी आहे का, असा प्रश्न पडतोच.

प्रभात रस्त्यावर १४ व्या गल्लीत प्राप्तिकर विभागाचे कार्यालय. त्यामुळे तिचे नावच इन्कम टॅक्स गल्ली. धनंजयराव गाडगीळ पथ असे खरे तर त्या रस्त्याचे अधिकृत नाव. व्यंकटेश माडगूळकरांचा ‘अक्षर’ प्रवासही याच रस्त्यावरचा. बाजूलाच असलेला मुकुंदराव आणि शांताबाई किर्लोस्कर यांचा ‘संपादन’ बंगला. आता या दोन्ही वास्तूंच्या पुनर्विकासातून ‘अक्षर’ आणि ‘संपादन’ अपार्टमेंट उभ्या राहिल्या.

या परिसरात ४० वर्षांहून अधिक काळ वास्तव्य असलेल्या ज्येष्ठ लेखिका विजया देव सांगतात, ‘पूर्वी मध्यवर्ती पेठांमधून प्रभात रस्ता दूर वाटायचा. इथपर्यंत येण्यासाठी टांग्याचा वापर होत असे. मोकळ्या, ऐसपैस जागा म्हणून हा परिसर विकसित झाला. आम्ही आलो तेव्हा काही या परिसराचे व्यावसायिकरण झाले नव्हते. आता पुनर्विकासाचे पत्रे आणि बांधकामाच्या सततच्या आवाजाने परिसरातील शांततेत खंड पडला.’

‘दोन हात झोपडी बांधू शकतात. मोठे घर बांधण्यासाठी अनेक हात लागतात…’ माडगूळकर तात्यांच्या घराबाहेर कोरलेले हे शब्द आजच्या पुनर्विकासाच्या कहाणीच्या शेवटीही धडा म्हणून कायम लक्षात ठेवण्यासारखेच. शेवटी, हातांमध्ये समन्वय नसला, की बांधायला घेतलेल्या शेकडो इमारती, हजारो घरे कोसळतातच. १५ गल्ल्या आणि अपुऱ्या पडणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये आकाराला येत असलेल्या पुनर्विकासाला कधी तरी नियंत्रणात आणता येईल, ही आशा बाळगणे एवढेच आपल्या हातात आहे.

tushar.suryawanshi@expressindia.com