Tariff War Effect On Pune Prawns: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर अतिरिक्त व्यापारकर लादल्यामुळे जगभरातील विविध क्षेत्रांमध्ये याचे बरे-वाईट परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या व्यापारकराच्या निर्णयामुळे पुण्यातील मच्छी बाजारावरही परिणाम झाला असून, पुण्यात कोळंबीच्या किमतीत मोठी घट झाली आहे.

भारतीय कोळंबीसाठी अमेरिका सर्वात मोठी बाजारपेठ आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतातून अमेरिकेत १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या कोळंबीची निर्यात झाली आहे. पूर्वी, भारतातून अमेरिकेत निर्यात करण्यासाठी सुमारे ८ टक्के व्यापार शुल्क होते, परंतु आता अतिरिक्त २७ व्यापार लागू केल्याने भारतीय निर्यातदारांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांसाठी व्यापारकर आकारणीला ९० दिवसांची स्थगिती दिली असली तरी, भारतातून अमेरिकेला होणाऱ्या सीफूड निर्यातीवर आधीच परिणाम झाला आहे. परिणामी, अनेक निर्यातदार त्यांची निर्यात कमी करत आहेत, ज्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सीफूडचा पुरवठा वाढत आहे आणि किमती कमी होत आहेत.

पुण्यातील कोळंबीच्या किमतीत २० टक्क्यांनी घट

पुण्यातील गणेश पेठेतील के एच परदेशी फिश कंपनीचे मालक म्हणाले की कोळंबीच्या किमतीत अंदाजे २० टक्के घट झाली आहे.

भोसरी येथील मसळीवाला सीफूड मार्केटचे मालक अक्षय शंभाजी शिंदे म्हणाले की, “दर कमी झाल्यामुळे लोक जास्त प्रमाणात कोळंबी खरेदी करत आहेत. विशेषतः महिला आपल्या मुलांना कोळंबी खायला घालण्यास प्राधान्य देतात कारण त्यामध्ये काटे नसाता आणि खाण्यास सोपे असतात. जे नियमित ग्राहक ४०० ते ४५० रुपये प्रति किलोने कोळंबी खरेदी करायचे त्यांना आता, ही कोळंबी ३५० रुपयांना मिळत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात याची खरेदी करत आहे.” याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

शिंदे यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पुढे सांगितेल की, “पुण्यातील सीफूड व्यापारी दोन प्रकारचे कोळंबी विकतात. यामध्ये आंध्र प्रदेशातून आणलेले गोड्या पाण्यातील कोळंबी आणि अलिबाग, मुंबई, गुजरात आणि रत्नागिरी येथून आणलेल्या समुद्रातील कोळंबीचा समावेश आहे.

पुण्यात कोळंबीचे दर

खराडी येथील घाऊक मच्छी बाजारातील कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्री पाण्यातील कोळंबीला तापनी २०० ते २५० रुपये प्रति किलो, पांढरी कोळंबी ६०० ते ६५० रुपये प्रति किलो, वाघी कोळंबी ५०० ते ६५० रुपये प्रति किलो आणि कपसी ३५० ते ४५० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. तर गोड्या पाण्यातील कोडंबी ४५० ते ५०० रुपये प्रति किलो आणि चैती ४४० रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत आहेत.