पुणे : मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाल्याने आता पुणेकरांना पावसाचे वेध लागले आहेत. शहराच्या आजूबाजूला वळवाच्या किंवा पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत असताना शहर मात्र कोरडेच आहे. त्यामुळे जून महिना सुरू होऊनही पुणेकरांना अद्याप उन्हाचे चटके, उष्मा सहन करावा लागतो आहे.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, शहरात मार्चमध्ये सरासरी ५.३, एप्रिलमध्ये १६.६, तर मेमध्ये ४०.६ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा मेमध्ये पुण्यात १३.१ मिलीमीटर इतकाच पाऊस नोंदवला गेला. तसेच यंदाचा मे महिन्यातील पाऊस २०२३ नंतरचा मे महिन्यातील नीचांकी ठरला. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील शिरूर, नारायणगाव, बारामती, लवळे अशा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्वमोसमी पाऊस पडला. काही ठिकाणी शेतीचे नुकसानही झाले. शहरात मात्र पूर्वमोसमी पावसाने हुलकावणी दिली.

याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. सी. सानप म्हणाले, ‘पूर्वमोसमी पाऊस सर्वत्र पडतोच असे नाही. या प्रकारचा पाऊस हा साधारणपणे स्थानिक स्वरूपाचा असतो.’ पूर्वमोसमी पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली नसल्याचे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘पूर्वमोसमी पावसासाठी तितक्या जास्त प्रमाणात बाष्प यावे लागते. हवेत असलेले बाष्प पाऊस होण्यासाठी पुरेसे नव्हते. अद्याप मोसमी पावसाचे आगमन पुण्यात झालेले नाही. त्यामुळे सध्या शहराच्या आजूबाजूला पडणारा पाऊस पूर्वमोसमी स्वरूपाचा आहे.’

‘सन २०२२, २०२३ मध्ये शहरात पूर्वमोसमी पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणात कोसळल्या होत्या. यंदाही एप्रिलमध्ये पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण काही वेळा कमी-जास्त होते. पूर्वमोसमी पावसासाठी हवेत बाष्प असावे लागते. यंदा मेच्या उत्तरार्धात कमाल तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी राहिले. त्यामुळे उष्णता वाढून बाष्पनिर्मिती होऊ शकली नाही हेही कारण असू शकते,’ असे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी नमूद केले.

पाण्याचे नियोजन आवश्यक

‘यंदाचे वर्ष हे ‘एल निनो’चे आहे. हवामानशास्त्र विभागाने देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आता पाण्याच्या नियोजनाचा विचार करणे आवश्यक आहे,’ याकडे कृष्णानंद होसाळीकर यांनी लक्ष वेधले.

जूनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता

‘भारतीय हवामानशास्त्र विभागासह खासगी संस्थांनी देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, राज्याचा विचार करता राज्यात मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर जूनच्या उत्तरार्धात राज्यात सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो,’ अशी शक्यता अनुपम कश्यपी यांनी वर्तवली.