पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून मिळकतकराची देयके तयार करण्यात आली आहे. मिळकतकराच्या बिलांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मे महिन्यांपर्यंत मिळकतकर भरणाऱ्यांना दर वर्षीप्रमाणे सवलत मिळणार आहे. नागरिकांना दिलेल्या मुदतीत मिळकतकर भरता यावा, यासाठी विविध पर्यायदेखील महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पुणे महानगरपालिकेचा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून मिळकतकर विभागाकडे पाहिले जाते. सर्वाधिक उत्पन्न जमा करणारा विभाग म्हणून मिळकत कर विभाग आणि बांधकाम विभाग पुढे असतो. गेल्या काही वर्षात पुणे शहराचा विस्तार चारही दिशांना मोठ्या प्रमाणात होत असल्याने नवीन नवीन गृह प्रकल्प शहरात उभे राहत आहेत. नव्याने तयार झालेल्या मिळकतींना महापालिका कर लावते या कराच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल महापालिकेचा तिजोरीत जमा होतो.

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या नवीन गावांमुळे पालिकेचे उत्पन्न अधिक वाढणार आहे. या गावांकडून मिळकत कर घेण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली होती. मात्र हा कर अधिक असल्याने त्यामध्ये सवलत द्यावी अशी मागणी समाविष्ट गावातील नागरिकांकडून केली जात आहे. ही मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने या गावातील नागरिकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या मिळकत कराला स्थगिती दिली आहे. परिणामी महापालिकेचे उत्पन्न घटत असल्याचे समोर आले आहे.

समाविष्ट गावातील मिळकत कराला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी महापालिकेच्या वतीने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. परंतु त्यामध्ये अद्यापही महापालिका प्रशासनाला यश आलेले नाही. समाविष्ट गावातील मिळकत करावा राज्य सरकारने स्थिती दिली असली तरी अनेक नागरिक स्वतःहून महापालिकेचा मिळकत कर भरत असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी ५०० कोटींपेक्षा अधिक भरणा या समाविष्ट गावातून नागरिकांनी केला आहे.

महापालिकेच्या मिळकतकर विभागाने चालू २०२६-२७ वर्षाची मिळकतकराची देयके तयार केली आहेत. ही देयके टपाल कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. नागरिकांनी वेळेत कर भरावा, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदादेखील पाच ते दहा टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. ३१ मे २०२६ पर्यंत ही सवलत असणार आहे. नागरिकांना कर भरता यावा, यासाठी विविध सुविधा पर्याय महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक तसेच कॉसमॉस बँक यांच्या शाखांमध्ये मिळकतकर भरता येणार आहे. तसेच, महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन उपायुक्त तथा कर आकारणी व कर संकलन प्रमुख रवी पवार यांनी केले आहे.