पुणे : शहरातील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी मिळकतींचा मिळकतकर माफ करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने प्रशासनाकडून अभिप्राय घेण्यासाठी पाठविला आहे. निवडणुकीदरम्यान ५०० चौरस फुटांपेक्षा कमी मिळकतींचा मिळकतकर माफ करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते.
महापालिका निवडणुकांमध्ये भाजपसह बहुतांश राजकीय पक्षांकडून शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींचा मिळकतकर माफ केला जाईल, असा शब्द जाहीरनाम्यात दिला होता. महापालिकेत सत्ताधारी झाल्यानंतर भाजप पहिल्याच बैठकीत याबाबत निर्णय घेऊन पुणेकरांंना दिलेला शब्द पाळेल, अशी चर्चा होती. मात्र, भाजपने यावर प्रशासनाचा अभिप्राय घ्यावा, असा निर्णय घेतल्याने दिलेला शब्द भाजप पाळणार की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम यांनी गेल्या आठवड्यात स्थायी समितीकडे पाचशे चौरसफुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा मिळकतकर माफ करावा, असा प्रस्ताव ठेवला होता. स्थायी समितीने त्याला मान्यता दिल्यास त्याचे श्रेय भाजपला न मिळता काँग्रेसला मिळणार असल्याचे लक्षात येताच स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य न करता प्रशासनाकडे अभिप्रायाला पाठविण्याची खेळी करण्यात आली.
स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, ‘पुणे महापालिकेची हद्दवाढ पाहता भविष्यात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. त्याचबरोबर करआकारणी न झालेल्या मिळकतींना आकारणी केली पाहिजे. ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे गरिबांची असतात. सध्याची वाढती महागाई पाहता त्यांचा मिळकतकर माफ करण्यात यावा, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली होती.’
भिमाले म्हणाले, स्थायी समितीच्या बैठकीत मिळकतकर माफीचा प्रस्ताव नगरसेवकांनी दिला आहे. त्यामुळे यावर प्रशासनाचा अभिप्राय मागविण्यात यावा, असा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या ५०० चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा मिळकतकर माफ केला जावा, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मुंबई महापालिकेने ५०० चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा मिळकतकर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिकेत सत्ताधारी झालेल्या भारतीय जनता पक्षासह इतर राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ५०० चौरस फुटापर्यंतच्या मिळकतींचा मिळकतकर माफ करण्याचे आश्वासन दिले होते.
भाजपच्या वरिष्ठ नेते नाराज
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत १६५ जागांपैकी ११९ जागा मिळवित भारतीय जनता पक्ष पाहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने २७, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तीन तर काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळविला आहे. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास ५०० चौरस फूट पर्यंतच्या मिळकतींना मिळकत करातून माफी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपचा एकाही सभासदाने तातडीने मिळकत करातील माफी बाबतचे पत्र दिले नाही. याचा फायदा घेत काँग्रेसच्या सभासदांनी हे पत्र दिले आहे. याबाबत सत्ताधारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करत महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना सुनावले असल्याची चर्चा सुरू आहे.

