पुणे : ‘निवडणूक-मिरवणूक म्हणजे इमानदार करदात्याची अडवणूक’, ‘संपूर्ण डीजेबंदी झालीच पाहिजे’, ‘शांतता आमचा हक्क आहे’ अशा घोषणा देत आणि हातामध्ये फलक घेत पुणेकरांनी ‘डीजे, ध्वनिवर्धक बंदीशिवाय माघार नाही’ असा निर्धार केला. ‘सोलापूर, मुंबई आणि नागपूरला डीजे बंदी होऊ शकते तर पुण्यात का नाही?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला असून ‘दहीहंडी उत्सवात ध्वनी पातळी रोखण्यात पोलिसांना अपयश आले’, अशी टीका मोर्चानंतरच्या छोटेखानी सभेत करण्यात आली.

गणेशोत्सवामध्ये आवाजाचा गोंगाट थांबण्ण्यासाठी डीजेवर बंदी घालावी, अशी मागणी करणारे विद्यानंद बापट यांना महापालिकेच्या नागरी सभेत विरोधाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आपली भूमिका मांडत असताना बापट यांना मारहाण करण्यात आली. तयाचा सकारात्मक निषेध व्यक्त करण्यासाठी ‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच’ने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत पुणेकर मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सामील झाले. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये मोर्चाच्या वेळेआधीच नागरिक जमा होण्यास सुरुवात झाली होती. तेथून पुणे महानगरपालिका इमारतीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. प्रौढ पुणेकरांचा रोष या आंदोलनात पहावयास मिळाला. सर्व धार्मिक, राजकीय, जातीय महापुरुषांच्या कार्यक्रमांमध्ये कर्णकर्कश्य ध्वनिवर्धकावर बंदी आणावी अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली. ‘आवाज बंद कर डीजे, तुला पुणेकरांची शपथ हाय’ तसेच डीजे बंदीच्या घोषणा या आंदोलनात पुणेकर देत होते.

पोलीस उपायुक्त रावले, सह आयुक्त अनुजा देशमाने यांना आंदोलनातर्फे मुकुंद किर्दत यांनी निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने उत्सवाअगोदरच कार्यक्रमापूर्वी या डीजेला प्रतिबंध करावा, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची नावे व मोबाइल क्रमांक नंबर जाहीर करण्यात यावेत, रियल टाईम डेटा दररोज संकेतस्थ‌ळावर टाकण्यात यावा, त्याची कारवाई संदर्भातील माहिती प्रसिद्ध करावी तसेच शारीरिक मानसिक नुकसान झाल्यास त्याला भरपाई मिळावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. नागपूर सोलापूर आणि मुंबईला होऊ शकते ते पुण्यात का नाही असा सवाल या वेळी विचारण्यात आला. येत्या आठवड्यात याबाबत निर्णय न झाल्यास पुणेकर पुन्हा नाईलाजाने रस्त्यावर उतरतील असा इशाराही मुकुंद किर्दत यांनी दिला.

या बिगर राजकीय आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने पुणेकरांसोबत संस्था संघटनेचे आणि राजकीय पक्षांचेही कार्यकर्ते आपला पक्षीय अभिनवेश बाजूला ठेवत सामील झाले होते. कर्णकर्कश डिजेविरोधामध्ये पुणेकर मोठ्या प्रमाणामध्ये एकवटले असून ‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच’ या नावाने समाज माध्यमावर मोठा पुणेकरांचा ग्रुप तयार झाला असून सहभागाने हा मोर्चा काढण्यात आला. मुकुंद किर्दत, सुनीती सु. र., सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, ॲड. असीम सरोदे, काँग्रेसच्या शहराध्यक्ष दीप्ती चवधरी, राष्ट्रवादीचे (शरद पवार) शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, सत्येंद्र राठी, ॲड. कृणाल घारे, चिंतामणी कांगो, नीता केळकर, डॉ. सिमी आठवले, डॉ राहुल सावंत, सुदर्शन जगदाळे, उमेश खंदारे, श्रीकांत भिसे, विक्रांत पाटील, अशोक मेहंदळे, आशिष गुंजाळ, कौस्तुभ खांडेकर, समीर बर्डे, मिलिंद केळकर, कीर्ती , विनोद पवार, तुषार कासार आदींनी सहभाग नोंदवला.

ध्वनिवर्धकाच्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांना कानाचे, हृदयाचे आणि लेझरमुळे डोळ्यांचे त्रास होतात. डीजेच्या आवाजाने हृदयाची धडधड वाढून हृदयविकाराचा झटका येतो. रक्तदाब वाढतो. बहिरेपण वाढते. लेझरच्या प्रकाशझोतामुळे दृष्टीदोष निर्माण होतात. विद्यानंद बापट हा आपला चेहरा आहे. – डाॅ. राहुल सावंत, हृदयविकारतज्ज्ञ

डीजे, ध्वनिवर्धक बंदीशिवाय माघार घ्यायची नाही. सोलापूर, मुंबई आणि नागपूरला डीजे बंदी होऊ शकते तर पुण्यात का नाही? दहीहंडी उत्सवात ध्वनी पातळी रोखण्यात पोलिसांना अपयश आले. ‘चार बेस आणि चार टाॅप’ला पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली असली तरी हे आम्हाला मान्य नाही. या यंत्रणेमुळे डेसिबल पात‌ळी वाढून ध्वनीप्रदूषण रोखण्याच्या कायद्याचे उल्लंघन होते. – मुकुंद किर्दत, समन्वयक, लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच