पुणे : ‘नीट’ पेपरफुटीवरून सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पुण्यातून पाठिंबा मिळाला. तसेच, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईला विरोध करण्यात आला. शहरातील विविध संस्था-संघटना, विद्यार्थी आणि पालकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले.

शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनात विद्यार्थी-पालकांनी वेगवेगळ्या माध्यमांतून शिक्षण व्यवस्थेविरोधात संताप व्यक्त केला. मीम्स, फलक आणि गाणी-घोषणांच्या माध्यमांतून सरकारविरोधात आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात सर्वच वयोगटांतील, मध्यमवर्ग-उच्च मध्यमवर्गातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘भारत माता की जय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘जय भीम, जय भीम’, ‘तानाशाही नही चलेगी’, ‘नरेंद्र मोदी राजीनामा द्या’, ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’ या आणि पोलीस-प्रशासनाविरोधीतील घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला.

अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, भारत जोडो अभियान, मानववादी जनशक्ती, राष्ट्र सेवा दल, लोकशाही उत्सव समिती, लोकसाही युवा संघटना, लोकस्वतंत्रता संघटना, श्रमिक महिला मोर्चा, सामाजवादी पार्टी, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आदी विद्यार्थी-सामाजिक संघटनांमधील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. काही जण लहान मुलांनाही घेऊन आले होते. पुण्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी आले होते. ‘‘नीट’ पेपरफुटीमुळे व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. सरकार साधा संवादही साधत नाही. आता हा जनआक्रोश आहे. या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल,’ अशी भावना आंदोलनातील एकाने व्यक्त केली.

वकिलांचे आंदोलन

सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यासाठी संविधान रक्षक वकील फोरमच्या वतीने जिल्हा न्यायालय परिसरात आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष ॲड. मोहन वाडेकर, ॲड. शाहिद अख्तर, ॲड. नीलिमा वर्तक, ॲड. एकनाथ सुगावकर, ॲड. लक्ष्मण राणे, ॲड. किरण कदम, ॲड. फैय्याज शेख, ॲड. नाथा शिंगाडे, ॲड. श्रीकांत अगस्ते, ॲड. महेश देशमुख, ॲड. शारदा वाडेकर, ॲड. निखिल गडकर, ॲड. नाथा शिंगाडे, ॲड. तौफिक शेख, ॲड. अमित पाडळे, ॲड. श्वेता कुंभारकर, ॲड. प्रज्वल मोरे आदी या वेळी उपस्थित होते.