पुणे : राज्य शासनाच्या निर्देशांनुसार पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने जून २०२६ मध्ये राबविलेली राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम शंभर टक्क्यांहून अधिक यशस्वी ठरली. नियोजित उद्दिष्टापेक्षा अधिक बालकांपर्यंत पोहोचण्यात महापालिकेला यश आले.
महापालिका हद्दीतील ३ लाख ८ हजार ६५६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी शहरभर विशेष लसीकरण केंद्रे उभारण्यात आली होती. ‘बूथ डे’ला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने २ लाख ७४ हजार ५४९ बालकांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतरही एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी महापालिकेने घरभेट मोहीम राबविली. त्यामुळे एकूण ३ लाख १२ हजार ३४२ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लशीचे दोन थेंब पाजणे शक्य झाले. हे प्रमाण निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या १०१ टक्के असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली.
पल्स पोलिओ मोहीम शहरात २८ जून ते २ जुलैदरम्यान पार पडली. ‘बूथ डे’नंतर घरभेट मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांनी दारोदारी जाऊन लसीकरण न झालेल्या बालकांचा शोध घेतला. पहिल्या दिवशी १२ हजार ८५३, दुसऱ्या दिवशी १० हजार १६६, तिसऱ्या दिवशी ६ हजार ४५२, चौथ्या दिवशी ४ हजार ३४४ आणि पाचव्या दिवशी ३ हजार ९७८ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला. घरभेट मोहिमेत एकूण ३७ हजार ७९३ बालकांचे लसीकरण करण्यात आले.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले होते. शहरातील विविध भागांत लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. तसेच, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रत्येक भागात लसीकरणावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. स्थलांतरित कुटुंबे, झोपडपट्ट्या, बांधकाम प्रकल्प, वीटभट्ट्या आणि इतर संवेदनशील भागांमध्ये विशेष पथके पाठवून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.
मोहीमेची ठळक आकडेवारी
- लसीकरणाचे उद्दिष्ट : ३,०८,६५६
- बूथ डे लसीकरण : २,७४,५४९
- घरभेट मोहिमेत लसीकरण : ३७,७९३
- एकूण लसीकरण : ३,१२,३४२
- उद्दिष्टपूर्ती : १०१ टक्के
