जेजुरी : मारहाणीची शिक्षा करून विद्यार्थ्यांना इजा केल्याप्रकरणी पुरंदर तालुक्यातील दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणिताची वही न आणल्याचा राग आल्याने शिक्षकाने चापट मारून विद्यार्थ्याच्या कानाला इजा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सासवड येथील वाघिरे हायस्कूल येथे हा प्रकार घडला. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सासवड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणिताचे शिक्षक गणेश पाठक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. संतोष कचरे यांचा मुलगा पाचवीच्या वर्गात शिकत आहे. मंगळवारी (२३ जुलै) तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. शिक्षकांनी गणिताची वही बाकावर काढून ठेवण्यास सांगितले. मात्र, वही घरी राहिल्याचे सांगताच शिक्षकाने त्याच्या डाव्या कानाखाली चापट मारली. तेव्हापासून मुलाचा कान दुखत असून त्याला ऐकू येत नसल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कचरे यांनी सासवड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.

हेही वाचा – राज्यात तीन दिवस पावसाची विश्रांती? हवामान विभागाचा अंदाज

हेही वाचा – पेरूला कवडीमोल भाव, बागा काढून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

दिवे गुरुकुल पाठशाळेतील शिक्षकावरही गुन्हा दाखल

दिवे (ता. पुरंदर) येथील श्रीराम गुरुकुल पाठशाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका लहान बालकाला कळकाच्या काठीने पाठीवर आणि पायावर मारहाण केल्याबद्दल शिक्षक मंदार शहरकर (रा. दिवे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांना सांभाळण्याची आणि काळजी घेण्याची गरज असतानाही भांडणे करतो या कारणामुळे संबंधित मुलाला मारहाण करण्यात आली. सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पुढील तपास करीत आहेत.