पुणे : ‘विज्ञान आणि संगीत या दोन्ही सत्याच्या शोधाकडे जाणाऱ्या दिशा आहेत. विज्ञान विश्वातील नियम शोधते, संगीत विश्वातील नाद शोधते. विज्ञान विचाराला उंची देते, संगीत विचाराला खोली देते. विज्ञान बुद्धीला समृद्ध करते. संगीत आत्म्याला समृद्ध करते,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. ‘भारतीय शास्त्रीय संगीत ही केवळ कला नाही. ती मनाला माहितीपासून ज्ञानाकडे, ज्ञानापासून प्रज्ञेकडे आणि प्रज्ञेपासून शांततेकडे नेणारी साधना आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने बालगंधर्व यांच्या ५९ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डाॅ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका श्रुती सडोलीकर-काटकर यांना बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार आणि गायक रघुनंदन पणशीकर यांना कोहिनूर गंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी माशेलकर बोलत होते. खासदार मेधा कुलकर्णी, उद्योजक कृष्णकुमार गोयल, मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, मानद अध्यक्ष विजयकांत कुलकर्णी, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुकुंद मराठे आणि आनंद भाटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. डाॅ. माशेलकर म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आपल्याला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’बरोबरच ‘ह्युमन इंटेलिजन्स’ आणि ‘एसआय’ म्हणजे ‘स्पिरिच्युअल इंटेलिजन्स’ यांची गरज आहे. शास्त्रीय संगीत ही ‘स्पिरिच्युअल इंटेलिजन्स’ विकसित करणारी एक महान परंपरा आहे. आपल्या तरुणांना मोबाइल, संगणक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आवश्यकतेबरोबर सुरांची, सौंदर्याची जाण संवेदनशीलता आणि संस्कार हे दिले नाहीत, तर आपण तंत्रज्ञानाने श्रीमंत होऊ; पण संस्कृतीने गरीब होऊ.’
‘बालगंधर्व यांनी केवळ गाणी गायली नाही. त्यांनी महाराष्ट्राला सौंदर्याची नवी दृष्टी दिली. त्यांनी संगीताला, नाट्यसंगीताला प्रतिष्ठा दिली. त्यांनी कलेला लोकांच्या हृदयात घर दिले. त्यामुळे त्यांचे स्मरण म्हणजे भूतकाळाची आठवण नव्हे. ती भविष्याची जबाबदारी स्वीकारणे आहे. विज्ञान आपल्याला विश्व समजून सांगते. संगीत आपल्याला स्वतःला समजून सांगते. विज्ञान आपल्याला यश देते.
संगीत आपल्याला अर्थ देते. विज्ञान मला विश्वातील सत्य शोधायला शिकवते. पण, संगीत मला त्या सत्याचं सौंदर्य अनुभवायला शिकवते. विज्ञानाशिवाय प्रगती अपुरी आहे आणि संगीताशिवाय प्रगतीला आत्मा नाही. ज्ञान आणि गान, बुद्धी आणि भावना, विज्ञान आणि अध्यात्म याचा सुंदर संगम घडविण्याचा दृढ निश्चय समाजाने अंगीकारणे हीच बालगंधर्वांना खरी आदरांजली ठरेल,’ असेही माशेलकर यांनी सांगितले. अनुराधा राजहंस आणि अवंती बायस यांनी सूत्रसंचालन केले.
माझे वडील आणि गुरू पं. वामनराव सडोलीकर हे उस्ताद अल्लादिया खाँ यांचे शिष्य. त्यांच्यामुळे मला बालगंधर्व यांच्या मैफली, नाट्यगीते ऐकण्याची संधी मिळाली. शास्त्रीय संगीतासह नाट्यसंगीतातील बारकाव्यांची जाणीव मला झाली. श्रोत्यांनी मला संगीत क्षेत्रात ६० वर्षे कार्यरत राहण्याची प्रेरणा दिली. श्रुती सडोलीकर-काटकर, ज्येष्ठ गायिका
