मागील काही वर्षांमध्ये रेल्वेच्या पुणे विभागाच्या उत्पन्नात झपाटय़ाने वाढ होत असून, २०१५-१६ या आर्थिक वर्षांमध्ये पुणे रेल्वेने साडेअकराशे कोटींहून अधिक विक्रमी उत्पन्नाची नोंद केली आहे. या उत्पन्नात तीन वर्षांमध्ये सुमारे साडेचारशे कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या संख्येमध्ये मागील वर्षभरात दोन टक्क्य़ांनी वाढ झाली असून, मालगाडय़ांच्या संख्येतही वाढ झाली आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या या आकडेवारीमधून उत्पन्नात भरीव वाढ दिसून पुणे रेल्वे फायद्यात असली, तरी त्यातून पुणे रेल्वेवर दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रवाशांचा भारही स्पष्ट होतो आहे. त्यामुळे उत्पन्नातील किती वाटा या प्रवाशांच्या सुविधांसाठी वापरात येईल, याकडे लक्ष लागले आहे.
रेल्वेच्या पुणे विभागात झपाटय़ाने विकसित होणारे विभाग व त्यात वाढत चाललेली लोकसंख्या लक्षात घेता रेल्वेच्या प्रवासी संख्येमध्ये सातत्याने वाढ नोंदविली जात आहे. दुसरीकडे माल वाहतुकीची मागणीही वाढली आहे. याचा परिणाम म्हणून दरवर्षी पुणे रेल्वेच्या उत्पन्नामध्ये सव्वाशे ते दीडशे कोटींची वाढ नोंदविण्यात येत आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षांमध्ये पुणे रेल्वेने वार्षिक उत्पन्नाचा एक हजार कोटींचा आकडा पार करीत १,०१७ कोटींचे उत्पन्न मिळविले होते. यंदा हे उत्पन्न १,१५४ कोटींवर पोहोचले असून, त्यात सहा टक्क्य़ांची वाढ झाली आहे. माल वाहतुकीतून यंदा ३२८ कोटी ८१ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न ७१ कोटींनी अधिक आहे. प्रवाशांच्या संख्येमध्ये दोन टक्क्य़ांची वाढ नोंदवली गेली आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षांत सात लाख ८३ हजार ६२० प्रवाशांच्या तिकिटातून ७१४ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यंदा सात लाख ९९ प्रवाशांच्या तिकिटातून ७५४ कोटींचे उत्पन्न मिळाले.
उत्पन्नाचे हे आकडे मोठे व दरवर्षी वाढत जाणारे असले, तरी त्यातून किती टक्के वाटा विभागातील स्थानकांच्या विकासासाठी व प्रवाशांच्या सुविधेसाठी दिला जातो, हे महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. पुणे विभागातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणात रेल्वे अर्थसंकल्पात पुणे विभागाला योग्य वाटा दिला जात नसल्याची प्रवासी संघटनांची सातत्याने तक्रार असते. यंदा पुणे रेल्वेने विक्रमी उत्पन्न नोंदविले आहे. पुढील काळात हे उत्पन्न वाढत जाणार असल्याचे दिसते आहे. त्यामुळे यापुढे तरी सुविधांच्या दृष्टीने योग्य वाटा दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दोन लाखांहून अधिक फुकटे प्रवासी
तिकीट तपासनिसांची कमतरता व गाडय़ांची वाढती संख्या यामुळे फुकटय़ा किंवा योग्य तिकीट न घेता प्रवास करणाऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान रेल्वेपुढे आहे. मात्र, वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून फुकटय़ांना पकडण्यात येत आहे. त्यातून दरवर्षी कारवाई केलेल्या फुकटय़ा प्रवाशांच्या संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे. तिकीट तपासणीच्या माध्यमातून २०१४-१५ या आर्थिक वर्षांत एक लाख ८६ हजार ६६३ प्रवाशांवर कारवाई करून १० कोटी ९ लाखांच्या दंडाची वसुली केली होती. यंदा दोन लाख ९ हजार ३०४ फुकटे प्रवासी सापडले असून, त्यांच्याकडून ११ कोटी ४३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.