पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून एक वर्षांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. बंडगार्डन पोलीस, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने बालिकेचे अपहरण करणाऱ्या एका महिलेसह तिघांना दौंड रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात बालिकेचे अपहरण केल्यानंतर तिची विक्री करण्यात येणार होती, अशी माहिती आरोपींनी चौकशीत पोलिसांना दिली.

बालिका आणि तिचे आई-वडील ३० मे रोजी पुणे स्टेशन परिसरात श्री दत्त मंदिरासमोरील मोकळ्या जागेत झोपले होते. बालिकेची आई झोपेत होती. त्या वेळी आरोपींनी आई शेजारी झाेपलेल्या बालिकेचे अपहरण केले. बालिका जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील ६५ ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. चित्रीकरणात एक महिला आणि तिच्या बरोबर असलेले दोन साथीदार फलाट क्रमांक चार परिसरातून पनवेल नांदेड रेल्वेतून बालिकेला घेऊन गेल्याचे दिसून आले.

त्यानंतर पुणे स्टेशन परिसरातून नांदेडकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची तपासणी सुरू करण्यात आली. लोहमार्ग पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आल्या. पोलिसांची पथके कुर्डुवाडी, बार्शी, सोलापूर, लातूर, दौंड परिसरात रवाना करण्यात आली. बालिकेचे अपहरण करणारे दौंड रेल्वे स्थानकात दिसून आले. आरोपी महिलेसह तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून बालिकेची सुखरुप सुटका करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त गौहर हसन, राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक संदीपान पवार, संतोष पांढरे, भगवान ईप्पर, सहायक निरीक्षक अभिजित चौगुले, उपनिरीक्षक वैभव मगदुम आणि पथकाने ही कारवाई केली.

पुणे रेल्वे स्थानकातून बालिकेचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. लोहमार्ग पोलिसांनी बालिकेचा शोध घेण्यासाठी सहाय केले. अपहरण झाल्यानंतर १६ तासात बालिकेच्या अपहरण प्रकरणाचा उलगडा करण्यात आला. आरोपींनी बालिकेचे अपहरण का केले? यादृष्टीने चौकशी करण्यात येत आहे. – गौहर हसन, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा