पुणे : पुणे रेल्वे स्थानक केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेकडून (डीआरआय) कारवाई करण्यात आली. मिझोराममधील महिलेकडून तीन कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून, या कारवाईनंतर अमली पदार्थ तस्करीचे आंतरराज्यीय जाळे उघडकीस येण्याची शक्यता ‘डीआरआय’मधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लालरे मलियानी (वय ३२, रा. ऐझाॅल, मिझोराम) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकातून निघालेल्या स्वर्णजयंती एक्सप्रेसमधून मलियानी प्रवास करत होती. तिच्याकडे अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती ‘डीआरआय’मधील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर मंगळवारी (२५ ऑगस्ट) पहाटे पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन परिसरात सापळा लावण्यात आला. महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मलियानी हिच्याकडील पिशवी, तसेच साहित्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्याकडील पिशवीत दोन हजार ५३२ ग्रॅम स्फटिकासारख्या दिसणाऱ्या गोळ्या सापडल्या, तसेच विविध रंगाच्या गाेळ्या सापडल्या. अमली पदार्थ तपासणी उपकरणाकडून (नार्कोटिक्स डिटेक्टशन किट) तपासणी करण्यात आली. तपासणीत मलियानीने अमली पदार्थ बाळगल्याचे उघडकीस आले. तिच्याकडून ॲम्फेटामाइन, क्रिस्टल मेथ, एमडीएमए अशा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत तीन कोटी ४१ लाख रुपये असल्याची माहिती ‘डीआरआय’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मलियानीची चौकशी करण्यात आली. तेव्हा अशिमा नावाच्या एका आफ्रिकन व्यक्तीने तिला हे अमली पदार्थ दिले होते. रेल्वे तिकिटाची व्यवस्था त्याने केली होती. म्हैसुरला पोहचल्यानंतर अमली पदार्थांची पिशवी एका व्यक्तीला देण्याची सूचना अशिमाने महिलेला दिली होती, अशी माहिती चौकशीत मिळाली. महिलेच्या मोबाइलची तपासणी करण्यात आली. तेव्हा अमली पदार्थ तस्करीचे महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. या प्रकरणात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी महिलेला विशेष न्यायालयाने ‘डीआरआय’च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.