पुणे : ‘पुण्याची वाढती लोकसंख्या पाहता येथे मेगा टर्मिनस उभारणीची आवश्यकता असून, त्या संदर्भातील कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. यासह पुणे रेल्वे स्थानक येथे ६ नवीन फलाट बनविण्यात येणार असून, अस्तित्वातील ६ फलाटांची लांबी वाढविण्यात येणार असल्याने रेल्वे वाहतुकीची क्षमता दुप्पट होईल,’ अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली. त्यासाठी सहाशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी सुरुवात झाली. तसेच, पुणे रेल्वे स्थानकात यार्डच्या रिमॉडेलिंगची पायाभरणी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले. पुणे स्थानक येथे केंद्रीय नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे, आमदार विवेक कोल्हे, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव, पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा आदी उपस्थित होते.
‘पुण्याची लोकसंख्या आणि रेल्वे प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराला मेगा टर्मिनसची आवश्यकता आहे. पुणे स्थानकावर सध्या असेलल्या सहा फलाटांबरोबरच आणखी सहा नवे फलाट उभारण्यात येतील. त्यामुळे फलाटांची संख्या बारा होणार आहे. तसेच, स्थानकासाठी नवीन प्रवेशद्वार, आळंदी येथे टर्मिनल आणि घोरपडी येथे कोचिंग डेपो उभारण्यात येणार आहे. या सुविधांमुळे पुण्यातून आणखी २० रेल्वे चालविणे शक्य होणार आहे. तसेच, मालवाहतुकीच्या ७ फ्रेटलाईन्स, १७ स्टॅबलिंग लाईन बनविण्यात येत आहेत. फुरसुंगी येथे नवीन ५ स्टॅबलिंग लाईन्स तयार करण्यात येत आहेत. पुणे रेल्वे स्थानक येथील रेल्वेचे कार्यान्वयन अर्थात ऑपरेशन कंट्रोल जुन्या प्रणालीवर असून त्याऐवजी पूर्णतः डिजिटल प्रणालीवर होईल,’ असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘राज्यात सध्या जवळपास दोन लाख कोटी रुपयांची रेल्वे क्षेत्रातील गुंतवणूक सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावानुसार जेनपीटी आणि वाढवण बंदरांना विदर्भ आणि मराठवाड्याशी समृद्धी महामार्गाद्वारे मालवाहतूक मार्गाने जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे राज्याच्या सुमारे ७५ टक्के भागाला थेट जोडणी मिळेल आणि वाहतूक खर्चात लक्षणीय घट होईल.’
बुलेट ट्रेन्समुळे मुंबई, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, आर्थिक कॉरिडॉर
‘मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा पुढील वर्षात कार्यान्वित होणार आहे. तसेच, मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा पुण्याला लाभ मिळणार आहे. बुलेट ट्रेनमुळे पुणे मुंबई प्रवास ४८ मिनिटांत प्रवास होईल. ज्यामुळे दोन शहरे ट्वीन शहरे होतील. तसेच, पुणे ते हैदराबाद अंतर २ तास ८ मिनिटांत गाठता येईल. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, सूरत, वापी, ठाणे हे आर्थिक कॉरिडॉर होतील,’ असेही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले.
अश्विनी वैष्णव म्हणाले…
– राज्यात रेल्वेच्या प्रकल्पांसाठीची तरतूद २० पटींनी वाढवून २३ हजार ९०० कोटी
– गेल्या १२ वर्षांत मलेशिया देशापेक्षा अधिक रेल्वे ट्रॅक तयार
– १३२ स्थानकांचा पुनर्विकास
– हडपसर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक रस्ता, जालना शहरांचा समावेश
– जिल्ह्यातील हडपसर, चिंचवड, आकुर्डी, बारामती, उरूळीसह राज्यातील १९ स्थानकांचे काम पूर्ण
– पुणे- नाशिक रेल्वेमार्गातील तांत्रिक अडचण दूर
अहिल्यानगर- शिर्डी आणि पुढे नाशिक अशी रेल्वे मार्गिका लवकरच
बेंगळुरू-पुणे- मुंबई वंदे भारत स्लीपर सेवा
‘हा धार्मिक, सामाजिक, आर्थिक कॉरिडॉर’
‘पुणे, अहिल्यानगर, शिर्डी या केंद्रांना विकासाच्या धाग्याने जोडणारा दिवस आहे. पुणे आणि परिसरातून शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या साईभक्तांसाठी ही रेल्वेसेवा उपयुक्त ठरणार असून, ही रेल्वेसेवा श्रद्धा, शिक्षण, रोजगार, विकास यांना जोडणारा मार्ग आहे. पुण्यात अहिल्यानगरमधून शिक्षणासाठी असलेले हजारो विद्यार्थी, व्यावसायिक, माहिती तंत्रज्ञान, वाहनउद्योग तसेच सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना, पुण्यात वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना या सेवेचा उपयोग होणार आहे. हा धार्मिक, सामाजिक, आर्थिक कॉरिडॉर तयार झाला आहे,’ असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलधीर मोहोळ यांनी सांगितले.
