पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर शयनयान वर्गातील प्रवाशांसाठी विश्रांतीकक्ष सुरू करण्यात आला आहे. फलाट क्रमांक एकवर हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. याचबरोबर दिव्यांगासाठी स्थानकावरील रॅम्पही खुले करण्यात आले आहेत.
विश्रांतीकक्षाचे उद्धाटन या महिन्यात निवृत्त होणारे मुख्य आरक्षण पर्यवेक्षक अनिल पाडळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह आणि स्थानक संचालक डॉ. रामदास भिसे उपस्थित होते. या विश्रांतीकक्षाची सुविधा प्रवाशांना मोफत मिळणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी जुन्या पादचारी पुलाशेजारील रॅम्प खुले करण्यात आले आहेत. या सुविधेचे उद्घाटन या महिन्यात निवृत्त होणारे मुख्य रेल्वे लिपिक वेंकट मोरे यांच्या हस्ते झाले. यामुळे दिव्यांग प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर व्हीलचेअर अथवा बॅटरीवर चालणाऱ्या वाहनाच्या सहाय्याने जाता येईल. या रॅम्पचा वापर करावयाचा झाल्यास प्रवाशांना फलाट एकवरील स्थानक उपव्यवस्थापकांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.