पुणे : वाढदिवस साजरा करण्यासाठी बिहारमधील प्रवासी तरुणाला धमकावून त्याच्याकडून दहा हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या रिक्षाचालकासह तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून रिक्षा, तसेच दहा हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. गणेश अण्णा जगधने (वय २९), अमोल उत्तम गायकवाड (वय ३२), अतुल रवींद्र गायकवाड (वय ३८, तिघे रा. डायस प्लाॅड, गुलटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका प्रवासी तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुण मूळचा बिहारमधील जहाँगिरपूरचा आहे. तो आणि त्याचा मित्र पुणे स्टेशन परिसरातून निघाले होते. त्या वेळी आरोपी रिक्षा चालक जगधने आणि साथीदारांनी फिर्यादी तरुणासह मित्राला अडवले. त्यांना धमकावले. फिर्यादी तरुणाला धमकावून त्याच्या पत्नीकडून दहा हजार रुपये ऑनलाइन मागवून घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपी रिक्षातून पसार झाले.
घाबरलेला तरुण आणि त्याचा मित्र हे बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. तांत्रिक तपासात आरोपी हे गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात वास्तव्यास असल्याची मााहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून जगधने, गायकवाड यांना ताब्यात घेतले. तपासात आरोपींनी वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवासी तरुणाला धमकावून खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले. परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता, प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनीष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी ही कारवाई केली.
पर्वती दर्शन परिसरात मोबाइल हिसकावला
पर्वती दर्शन परिसरात पादचाऱ्याला धमकावून त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ५२ वर्षीय तक्रारदार हे सहकारनगर भागात राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गेल्या महिन्यात ५ फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास पर्वती दर्शन परिसरातून निघाले होते. त्या वेळी मुक्तांगण शाळेजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांना धमकावून ६० हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस कर्मचारी जगताप तपास करत आहेत.
