पुणे : दिवसभर पुणे शहरात संततधार सुरू होती. मधेमधे जोरदार सरींचीही हजेरी. रस्त्यात खड्डे, साचलेल्या पाण्यामुळे न दिसणारे मॅनहोल, खोदकाम केलेल्या जागी नुसती खडी पसरल्याने असमान झालेला रस्ता, तर काही ठिकाणी खचलेला रस्ता. वाहनचालक दिवसभर कसरत करतच वाहने चालवत होते…
याच कसरतीत बोपोडीतील भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात टेम्पो अडकला. फक्त अडकलाच नाही, तर पाण्याच्या जोरदार प्रवाहात टेम्पो वाहून जाऊ लागला. तो वाहून जात असलेला जवळच बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी पाहिला. त्यांनी त्वरेने पावले उचलली आणि पोलिसांच्या या तत्परतेमुळे टेम्पोचालकाचे प्राण वाचले. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
त्याचे झाले असे, की जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर बोपोडीतील भाऊ पाटील रस्ता परिसरात भुयारी मार्ग आहे. तेथूनच मुळा नदीत वाहते. पावसामुळे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे पोलिसांनी भुयारी मार्गातील रस्ता दुपारी बाराच्या सुमारास लाेखंडी कठडे टाकून वाहतुकीस बंद केला होता. तेथे वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी नीलेश पुकाळे आणि नितीन कारले बंदोबस्तासाठी तैनात होते.
वाहतूक पोलिसांनी कठडे लावल्यानंतर वाहनचालकांना भुयारी मार्गातून न जाण्याच्या सूचना दिल्या. त्याच वेळेस एक टेम्पो तेथे आला. टेम्पोचालक राहुल पाटोळे यांनी पावसामुळे टेम्पोच्या काचा बंंद केल्या होत्या. त्यामुळे त्यांना पोलिसांची सूचना लक्षात आली नाही. पाटोळे यांनी त्यामुळे थेट भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात टेम्पो नेला. पाण्याच्या प्रवाहामुळे टेम्पो वाहून जाऊ लागला.
टेम्पो वाहून जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पाटोळे यांनी टेम्पोची काच उघडून मदतीसाठी आक्रोश केला. त्या वेळी तेथे तैनात असलेले वाहतूक पोलीस पुकाळे आणि कारले यांच्या कानावर त्यांचा आवाज गेला. त्यांनी मग तातडीने मदतकार्य सुरू केले. प्रसंगावधान राखून स्थानिकांच्या मदतीने दोराचा वापर करून टेम्पोचालक पाटोळे यांना बाहेर काढण्यात आले.
टेम्पोही हायड्रोलिक यंत्राचा वापर करून पाण्यातून बाहेर काढला गेला. पोलिसांच्या तत्परतेमुळे टेम्पोचालकाचे प्राण वाचले. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दोन्ही वाहतूक पोलिसांचे कौतुक केले.
पोलिसांचे आवाहन
‘पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात पाणी साचले आहे. भुयारी मार्गात पाणी साचले असून, अशा परिस्थितीत साचलेल्या पाण्यात वाहनचालकांनी वाहने नेण्याचा प्रयत्न करू नये. ज्या भागात लोखंडी कठडे लावले आहेत, अशा भागात जाऊ नये. नागरिकांनी पोलीस, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे,’ असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
