पुणे : शहर, तसेच उपनगरात मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग संथ झाला. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात झाडांच्या फांद्या कोसळल्या. दिवाळीनिमित्त महात्मा फुले मंडई, शनिपार परिसरात थाटण्यात आलेल्या तात्पुरत्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने साहित्याचे नुकसान झाले.
शहर परिसरात दोन दिवस वेधशाळेने पावसाचा इशारा दिला आहे. रविवारी (१ नाेव्हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. पहाटेनंतर पावसाचा जोर वाढल्याने शहरातील प्रमुख रस्ते, तसेच गल्ली-बोळांत पाणी साचले.
सोमवारी अनेक जण कामानिमित्त बाहेर पडले ते रेनकोट, छत्र्या घेऊन. सकाळी नऊनंतरही शहर परिसरात पावसाच्या सरी पडत होत्या. अनेक जण भिजत कामावर गेले. दिवाळीच्या तोंडावर पाऊस झाल्याने व्यावसायिक, विक्रेत्यांची धावपळ उडाली. दिवाळीनिमित्त महात्मा फुले मंडई, शनिपार, हुतात्मा बाबू गेनू चौक, रविवार पेठेतील बोहरी आळी, मोती चौक परिसरात रांगोळी, पूजा साहित्य, आकाश कंदील, रोषणाईचे साहित्य विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. रात्रभर झालेल्या पावसामुळे साहित्याचे नुकसान झाले.
पावसामुळे सकाळी शहरातील अनेक भागांतील सिग्नल यंत्रणा बंंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनासाठी पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. पावसामुळे वाहतुकीचा वेग संथ झाल्याची माहिती वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
शहर परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर, परिसरात झाडे, तसेच फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले. खडकी बाजार परिसरात मध्यरात्री मोठे झाड काेसळले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
