पुणे : विलंबाने सुरू झालेल्या पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसांत शहर आणि परिसरात चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पावसाळ्याचा अनुभव मिळू लागला आहे. मात्र, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाची तीव्रता कमी होण्याची चिन्हे आहेत.

यंदाच्या पावसाच्या संपूर्ण हंगामावर एल निनोची छाया आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने जुलै महिन्यासाठी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, देशातील बहुतांश भागांमध्ये, विशेषतः मध्य, पश्चिम आणि उत्तर भारतातील मोठ्या क्षेत्रांमध्ये जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याची सरासरी २८०.४ मिलीमीटर मानली जाते. मात्र, यंदा जुलैमधील एकूण पाऊस हा दीर्घकालीन सरासरीच्या ९४ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर, जूनचा पूर्ण महिना पावसाची प्रतीक्षा केल्यानंतर १ जुलैपासून शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली. घाट परिसरात पाऊस चांगला सक्रिय झाला आहे. ताम्हिणी, लोणावळा अशा घाट परिसरात एका दिवसात शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शहर आणि परिसरात पावसाने पकडलेला जोर ८ ते ९ जुलैपर्यंत कायम राहणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ‘सध्या सुरू असलेला पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार आहे. मात्र, ८ ते १४ जुलै या कालावधीत पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये देशभरात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. त्यात विदर्भ वगळता उर्वरित राज्यभरात कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित महिन्यातील पावसाच्या घडामोडींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रासह तीन हवामान प्रणाली सक्रिय असल्याने सध्या पावसासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. ही प्रणाली असेपर्यंत पाऊस राहील, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

शहरात दिवसभर रिपरिप, घाट परिसरात जोरदार

हवामान विभागाच्या शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या आकडेवारीनुसार घाट परिसरातील ताम्हिणी येथे १७०, लोणावळा येथे १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर शुक्रवारी रात्री साटेआठपर्यंच्या आकडेवारीनुसार शहर आणि परिसरातील शिवाजीनगर येथे ११, दापोडी येथे ११.५, पाषाण येथे १३.२, एनडीए येथे १३, चिंचवड येथे ८, लवळे येथे ५.५, शिरूर येथे ४.५ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे शहर आणि परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असली, तरी घाट परिसरात मुसळधार होत असल्याचे चित्र आहे.