पुणे शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होतो आहे. अशा स्थितीत पूरपरिस्थितीबाबत प्रशासनला सतर्क करण्यासाठी शहराच्या प्रत्येक भागातील पावसाच्या नोंदीकडे लक्ष ठेवणे आवश्यक असताना, याच कालावधीत महापालिकेची पर्जन्यमापक यंत्रणाच नादुरुस्त असल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे भर पावसाळ्यातच पर्जन्यमापक यंत्रणा दुरुस्तीचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. मात्र या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आराखडा तयार केला जातो. पावसाळ्यात उद्भवणारी पूरपरिस्थिती, जीवित आणि वित्तहानी, नदीत सोडले जाणारे पाणी, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस याचा सातत्याने आढावा घेतला जातो. त्यासाठी महापालिकेने पंधऱा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येकी एक याप्रमाणे पंधरा पर्जन्यमापक यंत्रणा उभारली होती. सन २०१४ मध्ये ही यंत्रणा सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आली. पर्जन्यमापक यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक तासाला क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झालेल्या पावसाची माहिती लघुसंदेशाद्वारे आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविली जाते.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला असून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या काही दिवसांत पर्जन्यमापक यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्यात येईल, असा दावा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

शहराच्या काही भागात अतिवृष्टीही होत आहे. –

अलीकडच्या काही वर्षात शहरात सातत्याने पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. शहराच्या काही भागात अतिवृष्टीही होत आहे. कमी वेळात जास्त पावसाची नोंद अनेक भागात होत आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका वाढला आहे. सहकारनगर, वडगांवशेरी, सिंहगड रस्ता परिसर, कोथरूड आदी भागातील नागरिकांना पूरपरिस्थिताचा सामना करावा लागला आहे. पुण्यात पुढील काही दिवस मुसळधारा कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र त्यानंतरही पर्जन्यमापक यंत्रणा बंद असल्याने महापालिकेचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे.

आपत्ती नियोजनासाठी आवश्यक –

पर्जन्यमापकाच्या माध्यमातून शहराच्या प्रत्येक भागातील पावसाच्या नोंदी होतात. त्या भविष्यातही आवश्यक असतात. सध्याही शहराच्या कोणत्या भागात जास्त पाऊस आहे, कोणत्या भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. मदतकार्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याचे नियोजन आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्याद्वारे करता येते. मात्र भर पावसाळ्यातच पर्जन्यमापक यंत्रणा बंद असल्याचे समोर आले आहे.