पुणे : शहर आणि परिसरात पावसाने गुरुवारी सुमारे दोन तास अक्षरश: धुमाकूळ घालून एप्रिलमधील एका दिवसातील सर्वाधिक पावसाचा १३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. पुण्यातील शिवाजीनगर येथे ४ एप्रिल १८९६ रोजी ५१.१ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला होता. हा एप्रिलमध्ये एका दिवसात पडलेला आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस होता. तो गुरुवारी ओलांडला जाऊन ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडू ते महाराष्ट्रादरम्यान द्रोणीय रेषा आहे. हवेच्या वरच्या स्तरात पाच ते दहा किलोमीटरवर असणारा थंड हवेचा झोत (जेट स्ट्रीम) खाली आला असून, तो दक्षिणकडे सरकला आहे. अशा वेळी हवेतील आर्द्रता वाढून वादळी पाऊस आणि गारपिटीसाठी पोषक स्थिती निर्माण होते. गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शहरात ३० मार्च रोजी बाणेरसह काही ठिकाणी गारपीट झाली होती, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर येथे नोंदवला गेलेला २६.६ मिलिमीटर पाऊस मार्चमधील दशकभरातील सर्वाधिक ठरला. तसेच, बुधवारीही शहरात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
या पार्श्वभूमीवर, गुरुवारी दुपारी दोन वाजल्यानंतर शहरातील वातावरण बदलण्यास सुरुवात झाली. आकाश ढगांनी व्यापले आणि अंधारून आले. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. जोडीला सोसाट्याचा वाराही वाहत होता. शहरातील मध्यवर्ती पेठा, कात्रज, औंध, बाणेर, बिबवेवाडी, कोथरूड, शिवाजीनगर, उंड्री अशा बहुतांश ठिकाणी दोन तासांहून अधिक काळ पावसाने जोरदार हजेरी लावली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक पाऊस एनडीए येथे ८४ मिलिमीटर नोंदवला गेला. शिवाजीनगर येथे ६५, हडपसर येथे ४२.५, पाषाण येथे ३६.३, दापोडी येथे २९, चिंचवड येथे २८.५, तर लोहगाव येथे २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सध्या वादळी पाऊस, गारपिटीसाठी पोषक स्थिती आहे. आणखी दोन ते तीन दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, या स्थितीची तीव्रता पूर्वेकडे सरकून मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, मराठवाडा, विदर्भात पाऊस, गारपिटीची शक्यता आहे.– एस. डी. सानप, हवामानशास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग
