पुणे : एल निनो स्थितीमुळे यंदाच्या पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली, परतीच्या पावसालाही जोर नव्हता. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या पावसाने विक्रम नोंदवला आहे. सोमवारी पडलेला पाऊस २०१९नंतर नोव्हेंबरमधील एका दिवसातील सर्वाधिक, तसेच यंदाच्या ८ जुलैनंतरचा सर्वाधिक पाऊस ठरला आहे.
बंगालच्या उपसागरातील तयार झालेल्या मुरासू या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडण्यासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात अर्णव या चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. त्याचा फारसा परिणाम झाला नाही. मात्र, मुरासू चक्रीवादळामुळे तापमानात वाढ होऊन वातावरणाच्या वरच्या थरात प्रभाव निर्माण झाल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली.
यंदा पुणे शहरात सर्वाधिक पाऊस जुलैमध्येच नोंदवला गेला होता. बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात लागोपाठ हवामान प्रणाली विकसित झाल्याने मोसमी वारे बळकट होऊन जोरदार पाऊस पडला. हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथे सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ४१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
हा जुलैनंतरचा एका दिवसातील सर्वाधिक पाऊस ठरला. त्यामुळे तीन ते साडेतीन महिन्यानंतर शहरात जोरदार सरी कोसळल्या. तसेच २०१९नंतरचा नोव्हेंबरमधील एका दिवसातील सर्वाधिक पाऊस ठरल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली. तर दिवसभरात शिवाजीनगर येथे १० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला.
जिल्ह्यातही जोरदार पाऊस, इंदापूरमध्ये १३१ मिलिमीटर शहरात झालेल्या पावसाप्रमाणे जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला. इंदापूर येथे अतिवृष्टीसदृश्य पावसाची नोंद झाली. इंदापूर येथे सर्वाधिक १३१ मिलिमीटर, बारामती येथे ७७, आंबेगाव येथे ४९.५, ढमढेरे येथे ३९.५, शिरूर येथे ३९, हडपसर येथे ३५.५, मगरपट्टा येथे ३०.५ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला.
