पुणे :  संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

 नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान हवामान विभागाने सोमवारी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

 संभाव्य अतिवृष्टी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पुणे शहर तयेच पुणे जिल्हा (ग्रामीण) क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना ही सुट्टी राहील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मात्र सर्व मुख्याध्यापक, शिक्षक  आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजासाठी सज्ज राहावे, असेही आदेश देण्यात आले आहेत.