scorecardresearch

पुणे : पाऊस, सिग्नल बंद शहरभर कोंडी ; खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप

पावसामुळे कोलमडून पडलेली सिग्नल यंत्रणा तसेच पावसामुळे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे बुधवारी शहरभर कोंडी झाली.

पुणे : पाऊस, सिग्नल बंद शहरभर कोंडी ; खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप
( संग्रहित छायचित्र )

पावसामुळे कोलमडून पडलेली सिग्नल यंत्रणा तसेच पावसामुळे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे बुधवारी शहरभर कोंडी झाली. खड्डयांमुळे वाहनांचा वेग कमालीचा संथ झाल्याने वाहनचालकांना कोंडी आणि खड्ड्यातून मार्ग काढावा लागल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले.

जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले. पावसाने उघडीप दिल्याने खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. शहरात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून पावसामुळे तात्पुरती डागडुजी करुन बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांमधील खडी बाहेर आली आहे. खड्ड्यात साठलेले पाणी आणि रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खडीमुळे वाहतुकीचा वेग संथ झाला आहे. बुधवारी सकाळी शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पावसामुळे शहरातील अनेक भागातील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली. पावसामुळे मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा वेग संथ झाला. खड्डे, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, कर्वे रस्ता, आरटीओ चौक, शंकरशेठ रस्ता, सातारा रस्ता, शास्त्री रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता परिसरात कोंडी झाली होती. मध्यभागातील बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहनांचा रांगा लागल्या होत्या.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या