पुणे : मोसमी पावसाच्या चार महिन्यांतील पहिला पंधरवडा कोरडा गेला. पावसाळा सुरू होऊनही पावसाचेच आगमन होत नसल्याने पुणेकरांना पावसाची तीव्र ओढ निर्माण झाली होती. अखेरीस रविवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह पावसाळ्यातील पहिल्या सरी बरसल्या असून, पुणेकर सुखावले आहेत.

यंदाच्या मोसमी पावसावर प्रशांत महासागरात सक्रीय झालेल्या एल निनोचे सावट राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानेही सरासरीपेक्षा कमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज वर्तवला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यातच मोसमी वारे पुण्यात दाखल झाले होते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जोरदार पावसाची नोंद झाली होती.

यंदा केरळमध्ये तीन दिवस उशीराने ४ जून रोजी केरळमध्ये दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी आगेकूच करत ७ जूनपर्यंत तळकोकणात मजल मारली. मात्र, त्यानंतर अनुकूल स्थिती नसल्याने मोसमी वाऱ्यांची प्रगती मंदावली. त्यामुळे १० जूनपर्यंत राज्यातसर्वदूर पोहोचण्याचे वेळापत्रक चुकले. इतकेच नाही, तर जूनमध्ये उन्हाळ्यासारखा उष्मा अनुभवावा लागत होता. लांबलेल्या पावसामुळे पाण्याच्या नियोजनाच्या दृष्टीने पुणे महापालिकेकडून पाणी वापरावर निर्बंध जाहीर केले आहेत.

या पार्श्वभूमीवर, रविवारी दुपारी दोननंतर अचानक आकाश भरून आले, काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. तसेच ढगांचा गडगडाटही होऊ लागला. संथ लयीत पावसाच्या सरी पडू लागल्या. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील दुचाकी चालकांना भिजावे लागले. काहींना आडोसा घ्यावा लागला. मात्र, त्याचवेळी खूप प्रतीक्षा करून पाऊस आल्याने खूश झालेल्या बच्चेकंपनीने पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात १ ते २० जून या कालावधीत पावसाची तूट निर्माण झाली आहे. मात्र, पुण्यासह घाट परिसरातही पावसाला सुरुवात झाली आहे.