पुणे : यंदाच्या पावसाळ्यावर ‘एल निनो’चे सावट असतानाही जुलैच्या आठ दिवसांत झालेल्या पावसाने दोन विक्रमांची नोंद केली आहे. गेल्या दशकभराचा आढावा घेतला असता यंदाचा जुलै महिना सर्वाधिक पावसाचा ठरला असून, जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत झालेला पाऊस हा आजवरचा सर्वाधिक ठरला आहे.
पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने घाट परिसरासह पुणे शहर आणि परिसरात जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने गती पकडली. यंदाच्या मोसमात प्रथम ६ जुलै रोजी शिवाजीनगर येथे २४ तासांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात जुलैमध्ये सुमारे १८९.१ मिलिमीटर पाऊस पडतो. १ ते ६ जुलै या कालावधीत झालेल्या झालेल्या पावसानेच जुलैची महिनाभराची सरासरी ओलांडली होती. त्यानंतरही पावसाचा जोर कायम राहिला. सन २०१५ ते २०२५ या कालावधीतील जुलैच्या पावसाच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास २०२४मध्ये ३९४ मिलिमीटर हा दशकभरातील सर्वाधिक पाऊस होता. मात्र, यंदा आठ दिवसांतच पावसाने ४०० मिलिमीटरचा टप्पा ओलांडून नवा उच्चांक नोंदवला आहे. ९ जुलैअखेर पुण्यातील शिवाजीनगर येथे ४०९ मिलिमीटर, तर १ जून ते ९ जुलै या कालावधीत ४७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
दशकभरातील सर्वाधिक पावसाचा विक्रम नोंदवतानाच आणखी एक विक्रमही नोंदवला गेला आहे. पुणे वेधशाळेकडे असलेल्या १९६९पासूनच्या नोंदींनुसार जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत झालेल्या पावसाच्या आकडेवारीत यंदाचा पाऊस सर्वाधिक ठरला आहे. या पूर्वी २००७मध्ये जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत २२८ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला होता.
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची पश्मिकडे होणारी वाटचाल, अरबी समुद्रात मुंबई-पुण्यावर स्थित असलेली द्रोणीय रेषा अशा घटकांमुळे मोसमी वारे सक्रिय झाले. आर्द्रता घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. घाट परिसरात पावसाची तीव्रता जास्त राहिली. हवामान प्रणालीची स्थिती जास्त काळ सक्रिय राहिल्यामुळे पावसाचे प्रमाणही वाढले. आता १० जुलैनंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.- एस. डी. सानप, हवामानशास्त्र, भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे वेधशाळा
गेल्या दहा वर्षांतील शिवाजीनगर येथील जुलैमधील पाऊस (मिलिमीटरमध्ये)
२०१५ – ६२
२०१६ – २२३
२०१७ – १९४.२
२०१८ – १७५.६
२०१९ – ३६९.१
२०२० – ११९.८
२०२१- १९३
२०२२ -३८६.२
२०२३ – १५४
२०२४ – ३९४
२०२५ – १३०.३
