पुणे : ‘एल निनो’ असतानाही जुलैमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाल्यानंतर यंदा ऑगस्टमध्ये पुण्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. गेल्या दशकभराच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता, यंदाचा ऑगस्ट तिसऱ्या क्रमांकांचा कोरडा ठरला आहे. पुणे जिल्ह्यातही २८ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला असून, सप्टेंबरमध्येही ऑगस्टप्रमाणेच सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदाच्या मोसमात भारतीय हवामानशास्त्र विभागाने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, जुलैमध्ये शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे जुलैमधील सर्वाधिक पावसाचा ११९ वर्षांचा विक्रमही मोडीत निघाला. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली, घाट परिसरात पावसाचा जोर होता. जुलैमधील पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे भरली.
हवामानतज्ज्ञांनी ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. महिन्याभरात शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. महिन्याभरात शिवाजीनगर येथे ८४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार २०२३ या ‘एल निनो’ असलेल्या वर्षी आणि २०२१मध्ये यंदाच्या ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसापेक्षाही कमी पावसाची नोंद झाली होती. तर गेल्यावर्षीच्या तुलनेतही ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडल्याचे दिसून येते.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत पुणे जिल्ह्यात २६७.८ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा २८ टक्के कमी, म्हणजेच १९३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पुणे आणि परिसरात ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यामागे बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवामान प्रणाली कारणीभूत होत्या. मात्र, ‘एल निनो’ची स्थिती विचारात घेता सप्टेंबरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तसेच पुढील चार ते पाच दिवसात आकाश ढगाळ राहून हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. – एस. डी. सानप, हवामानशास्त्र, भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे वेधशाळा
शिवाजीनगर येथे २०१६ ते २०२६ या कालावधीतील पाऊस (मिमी.मध्ये)
२०१६ – २३०.५
२०१७ – १६२.२
२०१८ – ८६.८
२०१९ – २०९.४
२०२० – २५५.७
२०२१ – ४०.६
२०२२ – १६४.२
२०२३ – ४२.१
२०२४ – २७९.३
२०२५ – १३४.७
२०२६ – ८४.६
