पुणे : ‘एल निनो’मुळे पाऊस कमी पडण्याचे सावट असतानाच जुलैमध्ये विक्रमी पाऊस नोंदवला गेला आहे. यंदा शिवाजीनगर येथे जुलैमध्ये ५२३ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून, शिवाजीनगर येथील जुलैमधील सर्वाधिक पावसाचा ११९ वर्षे जुना विक्रम मोडीत निघाला आहे.
मोसमी पावसाला विलंब झाल्यामुळे जून महिन्यात पावसाची तूट निर्माण झाली होती. मात्र, १ जुलैपासून पावसाने जोर पकडला. बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात एकाचवेळी हवामान प्रणाली विकसित झाल्याने मोसमी वारे बळकट झाले. त्यामुळे पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पुण्याच्या घाट परिसरात तर पावसाने धुमाकुळ घातला.
ताम्हिणी, लोणावळा अशा ठिकाणी एका दिवसात ५०० मिलिमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडला. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. शिवाजीनगर येथे आठ दिवसांत १९६९पासूनचा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर शहर आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत राहिला. त्यानंतर पुन्हा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्राचा प्रभावामुळे पावसाचे प्रमाण वाढले.
हवामान विभागाच्या नोंदींनुसार, जुलै १९०७मध्ये शिवाजीनगर येथे ५०८.५ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला होता. मात्र, यंदा १ ते ३१ जुलै या कालावधीत ५२३ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे ११९ वर्षे अबाधित असलेला जुना विक्रम मोडीत निघून नवा उच्चांक नोंदवला आहे. यापूर्वी २००६मध्ये शिवाजीनगर येथे ४०४०.९, २०२४मध्ये ३९४, २०२२मध्ये ३८६.२ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला होता. यंदाच्या वर्षाचे वेगळेपण म्हणजे, एल निनो स्थितीचा फटका बसून सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी होण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवलेला असताना शिवाजीनगर येथे जुलैमध्ये विक्रमी पाऊस नोंदवला गेला आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत शिवाजीनगर येथे ५८७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.
गेल्या दहा वर्षांतील शिवाजीनगर येथील जुलैमधील पाऊस (मिलिमीटरमध्ये)
२०१५ – ६२
२०१६ – २२३
२०१७ – १९४.२
२०१८ – १७५.६
२०१९ – ३६९.१
२०२० – ११९.८
२०२१- १९३
२०२२ -३८६.२
२०२३ – १५४
२०२४ – ३९४
२०२५ – १३०.३
पुणे जिल्ह्यात १२९ टक्के पावसाची नोंद
हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत सरासरी ३१०.२ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा याच कालावधीत ७०९.५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे महिन्याभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊन १२९ टक्के पावसाची नोंद झाली.
जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज होता. मात्र, बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात लागोपाठ तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रासारख्या प्रणाली पावसासाठी पूरक ठरल्या. दोन प्रणाली तर महाराष्ट्रावरूनच जात होत्या. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले. काही दिवसांपूर्वीपर्यंत पावसाची असलेली तूट बऱ्याच प्रमाणात भरून निघाली आहे. – एस. डी. सानप, हवामानशास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे वेधशाळा
