पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. शहरात ठिकठिकाणी सुमारे अर्धा तास ते तासभर वादळी पाऊस झाला. मात्र, या वादळी पावसामुळे सुमारे दोन महिन्यांनी शिवाजीनगर येथे दोन आकडी पाऊस नोंदवला गेला आहे.

यंदाच्या पावसाच्या संपूर्ण हंगामावर ‘एल निनो’चा प्रभाव राहणार असल्याचे, सरासरीपेक्षा कमी पावासाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने दीर्घकालीन अंदाज जाहीर करतानाच स्पष्ट केले होते. दरवर्षी १० जूनच्या सुमारास पुण्यात दाखल होणाऱ्या मोसमी वाऱ्यांना यंदा विलंब झाला. मात्र, जूनमध्ये कमी पावसामुळे निर्माण झालेली तूट जुलैमध्ये भरून निघाली. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवामान प्रणालींमुळे जुलैमध्ये जवळपास दोन आठवडे जोरदार पावसाची नोंद झाली. या पावसाने शहर आणि परिसराला झोडपून काढले. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निरामाण झाली. तसेच पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे भरल्याने शहराची पाण्याची चिंता मिटली. मात्र, ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेले.

पावसाने दडी मारल्याने गेल्या ५० दिवसांहून अधिक काळ शिवाजीनगर येथे दिवसभरात दोन आकडी पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे ‘ऑक्टोबर हिट’चे चटकेही जाणवत आहेत. मात्र, सोमवारी दुपारनंतर अचानक आभाळ भरून येत वादळी पाऊस झाला. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ शहरात ठिकठिकाणी पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दुचाकीस्वारांना आडोसा घ्यावा लागला, तर अनेकांवर भिजण्याची वेळ आली. वादळी पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साठल्याचे चित्र होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या रात्री साडेआठपर्यंतच्या आकडेवारीनुसार शिवाजीनगर येथे १७.१, एनडीए येथे १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस

देशातील पावसाचा हंगाम (जून ते सप्टेंबर) केवळ दोनच दिवस बाकी आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. राज्य सरकारने दुष्काळी तालुके जाहीर केले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांचाही समावेश आहे. हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार १ जून ते २८ सप्टेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यात १०७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वसाधारणपणे या कालावधीत ९३६ मिलिमीटर पाऊस नोंदवला जातो.