पुणे : ‘एल निनो’ स्थितीमुळे कमी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवला जात असताना पुण्याच्या घाट परिसरातील ताम्हिणी, लोणावळा, मुळशी अशा ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यातही भिरा आणि ताम्हिणी येथे ९ हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला असून, घाट परिसरातही मोसमातील सर्वाधिक पाऊस जुलैमध्येच पडल्याचे निरीक्षण हवामानतज्ज्ञांनी नोंदवले.
दरवर्षी १० जूनच्या सुमारास पुण्यात दाखल होणाऱ्या मोसमी वाऱ्यांना यंदा विलंब झाला. त्यामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला. यंदाच्या पावसाच्या संपूर्ण हंगामावर ‘एल निनो’चा प्रभाव राहणार असल्याने सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दीर्घकालीन अंदाजामध्ये वर्तवली होती. त्यानंतर जुलैमध्ये घाट परिसरात अतिवृष्टीसदृश पाऊस पडला. घाटमाथ्यावरील ताम्हिणी, लोणावळा, भिरा अशा एका दिवसात ५०० मिलिमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. पावसाची वार्षिक सरासरी लोणावळा येथे ४ ते ५ हजार मिलिमीटर, ताम्हिणी येथे ६ ते ७ हजार मिलिमीटर, भिरा येथे ४ ते ५ हजार मिलिमीटर, मुळशी येथे २ ते ३ हजार मिलिमीटर आहे. मात्र, एल निनो स्थिती असतानाही या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ताम्हिणी येथे २०२४मध्ये ९ हजार ६४४, २०२५मध्ये ९ हजार १०९ मिलिमीटर, यंदा ९ हजार ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने सलग तीन वर्षे नऊ हजार मिलिमीटरचा टप्पा गाठला गेला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, एल निनो स्थितीचा पावसावर परिणाम झाल्याचे दिसून येते. यंदा जून, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, जुलैमध्ये जास्त पाऊस नोंदवला गेला. देशभरातही जुलैमध्येच चांगला पाऊस झाला. सर्वसाधारणपणे जुलैमध्ये मोसमी वारे तीव्र होत असल्याने जुलैमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते. मात्र, यंदा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण झालेल्या हवामान प्रणालींमुळे जुलैमधील पावसाचे प्रमाण वाढले. एल निनो स्थितीमध्ये अतिपावसाच्या घटना घडतात. पुणे परिसरातील घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण सर्वसाधारणपणे जास्त असते. यंदाही जुलैमधील पावसामुळे घाट परिसरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
यंदाच्या मोसमातील पाऊस (मिलिमीटरमध्ये )
भिरा – ९८३३ मिलिमीटर
ताम्हिणी – ९११३ मिलिमीटर
शिरगाव – ७३९२ मिलिमीटर
लोणावळा – ५७९६ मिलिमीटर
मुळशी – ३३३६ मिलिमीटर
