पुणे : खडकवासला धरण साखळीत मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून २७ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली गेले. शहरातही पावसाची संततधार सुरू असून, दैनंदिन जनजीवनावर परिणाम झाला आहे

नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून, नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लोखंडी कठडे टाकण्यात आले आहेत.
खडकवासला धरण साखळीत मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. टप्याटप्याने पाणी सोडण्यात आले. बुधवारी सकाळी धरणातून २७ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले.

शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर ते डेक्कन जिमखाना, डेक्कन जिमखाना ते एरंडवणे भागातील रजपूत वीटभट्टी परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले. या रस्त्यांचा वापर कोथरूड, एरंडवणेकडे जाण्यासाठी केला जातो.

मुठा नदी दुथडी भरून वाहत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून नदीपात्रातील रस्त्यांवर कठडे टाकून ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. तेथे पोलीस, तसेच अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

नदीकाठाला लागून असलेल्या वसाहतीतील रहिवाशांना प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्रात लावलेली दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यात बुडाली आहेत. पाणी ओसरेपर्यंत नदीपात्रातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जंगली महाराज रस्त्यावर झाड कोसळले

जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकाजवळ मध्यरात्री मोठे झाडे काेसळले. शिवाजीनगर भागातील एका सोसायटीसमोरही झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. झाशीची राणी चौकाजवळ झाड कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवाानांनी घटनस्थळी धाव घेतली. झाडाच्या फांद्या कापण्यात आल्या. झाडाच्या फांद्या बाजूला काढून रस्ता वाहतुकीस खुला करुन देण्यात आला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.