पुणे : देशातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीत पुण्याची आगेकूच सुरू आहे. पुण्याने या गुंतवणुकीत देशात चौथा क्रमांक पटकाविला आहे. राज्यातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीत पुण्याचा वाटा ९.७ टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना ‘ॲम्फी’चे मुख्याधिकारी वेंकट चालसानी यांनी दिली.

देशात म्युच्युअल फंड गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात १ कोटी ६ लाख २३ हजार ४१७ गुंतवणूकदार असून, त्यांपैकी ३०.४ टक्के महिला आहेत. देशात डिसेंबर २०२५ अखेरीस म्युच्युअल फंडातील व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ८० लाख २३ हजार ३७९ कोटी रुपये होती. त्यात महाराष्ट्राचा वाटा ४० टक्के म्हणजेच ३२ लाख ३९ हजार ४८६ कोटी रुपये आहे. महाराष्ट्रातील एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेत पुण्याचा वाटा ९.७ टक्के असून, तो ३ लाख १३ हजार २३८ कोटी रुपये आहे. पुण्यातील म्युच्युअल फंड खात्यांची संख्या ७९ लाख ६५ हजार ७०२ आहे, असे चालसानी यांनी सांगितले.

राज्यभरातून शिस्तबद्ध गुंतवणूक योजनेत (एसआयपी) सहभाग वाढत आहे. राज्यात २ कोटी १० लाख ११ हजार ८७५ एसआयपीधारक आहेत. राज्याच्या एकूण म्युच्युअल फंड खात्यांमध्ये त्यांचे प्रमाण ३५ टक्के आहे. देशातील एसआयपीधारकांपैकी सुमारे २१ टक्के महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील एसआयपी व्यवस्थापनाखालील मालमत्ता ४ लाख ५० हजार ३८२ कोटी रुपये आहे. देशातील एकूण एसआयपी व्यवस्थापनाखालील मालमत्तेत महाराष्ट्राचा वाटा २७ टक्के आहे. राज्यात म्युच्युअल फंड वितरकांचे मोठे जाळे असून, गुंतवणूकदारांचा सहभाग वाढविण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. राज्यात एकूण ८६ हजार ६८० अधिकृत वितरक असून, त्यात पुण्यातील १० हजार ४९६ वितरकांचा समावेश आहे, असे चालसानी यांनी स्पष्ट केले.

देशातील आघाडीची शहरे

१) मुंबई<br>२) दिल्ली
३) बंगळुरू
४) पुणे<br>५) कोलकता
६) अहमदाबाद
७) चेन्नई
८) हैदराबाद
९) बडोदा
१०) जयपूर

म्युच्युअल फंडला प्राधान्य

पुण्यातील उद्योजकता आणि वाढता नोकरदार वर्ग यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना मिळत आहे. म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे व्यावसायिक व्यवस्थापन आणि पारदर्शकता यांची खात्री देतात. त्यामुळे गुंतवणूकदार पारंपरिक बचतीच्या पर्यायाऐवजी म्युच्युअल फंड गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत, असे वेंकट चालसानी यांनी नमूद केले.