दांडेकर पूल येथील कालवा फुटीला उंदीर, घुशी, खेकडे यांच्यासह आणखी दहा कारणे आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर झाल्यानंतरच यातील सत्य बाहेर येईल असे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी सांगितले. पुणे शहरात समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या कामांबाबत शिवतरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत गुरुवारी बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे दोन पंप बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नावर बोलताना शिवतरे म्हणाले, पुणे शहराच्या आजच्या पाणी पुरवठ्याबाबत मला माहिती नाही. मात्र, पुणे शहराची ४० लाख लोकसंख्या आहे. या लोकसंख्येचा विचार करिता ८.२५ टीएमसी पेक्षा जास्त पाणी पुणे महापालिकेने घेता कामा नये.

जागतिक नियमानुसार, पाणी कमी आणि जपून वापरा अशा सूचना कालवा समितीने केल्या होत्या. सद्यस्थितीला १३५० एमएलडी पाणी वापरणे आवश्यक असताना १६५० एमएलडी पाणी वापरले जात आहे. काहीही झाले तरी पुणे महापालिकेने नियमानुसार पाणी वापरायला हवे असे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.