पुणे : रविवार पेठेतील सोन्याचे दागिने घडविणाऱ्या सराफ व्यावसायिकाच्या घरातून दोन किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे चोरणाऱ्या काका-पुतण्याला खडक पोलिसांनी गजाआड केले. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतर बारा तासांत गुन्ह्याचा छडा लावला. आरोपींकडून चोरलेल्या सोन्यासह अतिरिक्त ४६ ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून एकूण मिळून दोन कोटी २४ लाख ८६२ रुपयांचे सोने जप्त करण्यात आले.
या प्रकरणी मुस्तफा नजीर शेख (वय ३६), त्याचा पुतण्या सरफराज उर्फ आवेज मैनुद्दीन शेख (वय २२, दोघे रा. रविवार पेठ) यांना अटक करण्यात आली. या बाबत दागिने घडविणाऱ्या कारागिराने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदाराकडे सराफ बाजारातील सराफ व्यावसायिक दागिने घडविण्यासाठी सोने देतात. कारागीर आणि त्याची पत्नी हे रविवार पेठेतील जुनी गुजरी भागात एका सोसायटीत राहायला आहेत. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कारागीर आणि त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेले सुमारे दोन किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे चोरून नेली. रात्री साडेआठच्या सुमारास सोने चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा सोसायटीच्या आवारात दोन संशयित दिसले. . सोने चोरणारे चोरटे सोसायटीत राहत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी मुस्तफा शेख आणि त्याचा पुतण्या सरफराज यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी सोने चोरीची कबुली दिली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसाेडे, उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, उपनिरीक्षक राहुल मखरे, दाढे, खाडे, सहायक फौजदार संतोष मोहिते, विनोद शिंदे, हवालदार मयूर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, नीलेश साबळे, विकास पांडाेळे, सैफ नदाफ, उमेश मठपती, कुडले यांनी ही कामगिरी केली.
तपास पथकाचे अभिनंदन
रविवार पेठेत दागिने घडविणाऱ्या कारागिराच्या घरातून दोन कोटी २४ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खडक पोलिसांच्या तपास पथकाने या गुन्ह्याचा १२ तासांत छडा लावला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपाेलीस आयुक्त संजय दराडे यांनी तपास पथकाने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. आरोपींकडून चोरलेला सर्व ऐवज जप्त करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी सांगितले.
