पुणे : पुणे महानगरात गृहनिर्माण क्षेत्रात सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. यंदा तिसऱ्या तिमाहीत नवीन घरांच्या पुरवठ्यासह विक्रीत मोठी वाढ झाली आहे. महानगरातील नवीन घरांमध्ये ८० लाख ते १.५ कोटी रुपये किमतीच्या घरांचा वाटा जवळपास ५० टक्के आहे. आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला असून, आगामी काळात घरांच्या मागणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
अनारॉक ग्रुपने देशातील सात महानगरांतील गृहनिर्माण क्षेत्राचा जुलै ते सप्टेंबर या तिमाहीचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, देशात तिसऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत आधीच्या तिमाहीच्या तुलनेत १० टक्के वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत एकूण १ लाख २२० घरांची विक्री झाली असून, दुसऱ्या तिमाहीत ती ९० हजार ७१५ होती. तिसऱ्या तिमाहीत एकूण १.५२ लाख कोटी रुपयांचे घरांचे व्यवहार झाले आहेत. याचबरोबर तिसऱ्या नवीन तिमाहीत घरांच्या पुरवठ्यात ८ टक्के वाढ झाली आहे. नवीन घरांचा पुरवठा तिसऱ्या तिमाहीत १ लाख १४ हजार ३२० असून, दुसऱ्या तिमाहीत तो १ लाख ५ हजार ९९५ होता. देशभरात घरांची सरासरी किंमत प्रतिचौरसफूट ९ हजार ७१४ रुपयांवर पोहोचली आहे.
पुण्यात तिसऱ्या तिमाहीत नवीन घरांचा पुरवठा १८ हजार ७३० झाला. तो आधीच्या तिमाहीत (एप्रिल ते जून) १२ हजार ७३० होता. त्यात आता ४७ टक्क्यांची वाढ झाली आहे. नवीन घरांच्या पुरवठ्यात ८० लाख ते १.५ कोटी रुपये किमतीच्या घरांचा वाटा ५१ टक्के आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत पुरवठ्यात ३ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. तिसऱ्या तिमाहीत घरांची विक्री १५ हजार ६९० झाली आहे. आधीच्या तिमाहीत ती १३ हजार ९० होती. त्यात आता २० टक्के वाढ झाली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत ६ टक्के घट झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे.
यंदाच्या सणासुदीच्या काळात पुण्यात घरखरेदीला गती मिळालेली आहे. विशेषतः हिंजवडी, रावेत, खराडी यांसारख्या रोजगार आणि पायाभूत सुविधांशी जोडलेल्या भागांमध्ये ग्राहकांचा प्रतिसाद सकारात्मक आहे. सणासुदीच्या काळात दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीतील शुभ दिवसांमध्ये घरांच्या नोंदणीचे प्रमाण नेहमीच वाढते, कारण अनेक ग्राहक घरखरेदीसाठी या दिवसांना प्राधान्य देतात. आजचा ग्राहक केवळ सवलतीकडे न पाहता मोठी घरे, चांगल्या सुविधा, वाहतुकीच्या सुविधा आणि दीर्घकालीन मूल्य यांचा विचार करून निर्णय घेत आहे, असे निरीक्षण विकासकांनी नोंदविले.
