Pune Real Estate Market Growth: पुण्यात जमिनीचे भाव गगनाला भिडले असून, कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू आहेत. अनेक मोठ्या विकासकांकडून जमीनखरेदीसाठी पुण्याला पसंती मिळत आहे. त्यामुळे सरत्या आर्थिक वर्षात मुंबईला मागे टाकून पुण्याने आघाडी घेतली आहे.
देशातील ग्रामीण भागातील लोक रोजीरोटीच्या शोधात आणि चांगल्या भविष्याची स्वप्ने घेऊन शहरात येतात. या स्थलांतराचा वेग गेल्या काही वर्षांत खूप वाढला आहे. यामुळे मोठ्या शहरांचा प्रचंड वेगाने विस्तार होत आहे. याचबरोबर नोकरीनिमित्त देशांतर्गत मोठे स्थलांतर होत आहे. याचाच परिणाम होऊन महानगरांमध्ये घरांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. घरांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहे. राज्याचा विचार करता पुणे जिल्हा गृहनिर्माण क्षेत्रात आघाडीवर आहे. राज्यात गृहप्रकल्पांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. गृहप्रकल्पांची संख्या वाढत असताना त्यासाठीच्या जमिनीची मागणीही वाढू लागली आहे. त्यातही आता पुण्याने राज्यात अग्रक्रम मिळविला आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये देशातील महानगरांमध्ये जमिनीचे १११ मोठे व्यवहार झाले. त्यातून एकूण २ हजार ९९४ एकरहून अधिक जमिनीची विक्री झाली. देशातील महानगरांमध्ये जमीन व्यवहारांत बंगळुरू प्रथमस्थानी आहे. बंगळुरूत एकूण २९३ एकरांचे १७ व्यवहार झाले. त्यानंतर पुण्याचा दुसरा क्रमांक असून, ७८ एकरांचे आठ व्यवहार झाले आहेत. त्याखालोखाल मुंबई महानगरात ५१ एकरांचे सात व्यवहार, चेन्नईत ७४ एकरांचे पाच व्यवहार, हैदराबादमध्ये ३८ एकरांचे पाच व्यवहार, दिल्लीत १८ एकरांचे दोन व्यवहार आणि कोलकत्यात पाच एकराचा एक व्यवहार झाल्याचे अनारॉक ग्रुपच्या ताज्या अहवालातील आकडेवारी दर्शविते. बडोदा, नागपूर, पानिपत, म्हैसूर, रायपूर आणि कोईम्बतूर यांसारख्या शहरांतही सूचिबद्ध विकासकांकडून जमीन व्यवहार करण्यात आले आहेत.
जमिनीच्या व्यवहारांमध्ये मोठ्या आणि सूचिबद्ध विकासकांचा वाटा वाढत आहे. यामागे प्रामुख्याने भूसंपादनात वाढलेली नियामक चौकट आणि जमिनींचे वाढते भाव कारणीभूत ठरत आहेत. जमिनींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने खरेदी व्यवहारासाठी जास्त भांडवलाची आवश्यकता निर्माण होत आहे. सूचिबद्ध विकासकांना बँका, तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारणी करणे सोपे जाते. त्याच वेळी असंघटित आणि छोट्या विकासकांचा जमिनीच्या व्यवहारांतील वाटा कमी होत आहे. विशेष म्हणजे, देशातील महानगरांमध्ये एकट्या गोदरेज प्रॉपर्टीजने ४४३ एकरांचे १७ व्यवहार केले असून, त्या खालोखाल ब्रिगेड ग्रुपने ८१ एकरांचे आठ व्यवहार केले आहेत.
जागतिक पातळीवर पश्चिम आशियातील युद्धामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम गृहनिर्माणसह इतर क्षेत्रांवर होत आहे. गेल्या दोन वर्षांत गृहनिर्माण क्षेत्राला उतरती कळा लागली आहे. याचाच परिणाम देशातील जमिनीच्या खरेदी व्यवहारांवर काही प्रमाणात झाला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मोठ्या जमीन व्यवहारांची संख्या १४३ होती. ती गेल्या आर्थिक वर्षात घटून १११ वर आली आहे. त्यामुळे आगामी काळात गृहनिर्माण क्षेत्रातील घसरणीचे चित्र कायम राहण्याची चिन्हे आहेत.
पुण्यातील मोठे व्यवहार
गेल्या आर्थिक वर्षात पुण्यात झालेल्या मोठ्या व्यवहारांमध्ये गोदरेज प्रॉपर्टीज, के. रहेजा ग्रुप आणि कासाग्रँड या कंपन्यांचा समावेश आहे. गोदरेज प्रॉपर्टीजने म्हाळुंगे परिसरात ८.५ एकर जमीन विकत घेतली. तिथे निवासी प्रकल्प उभारून २ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळविण्याची कंपनीची योजना आहे. के. रहेजा कॉर्पोरेशनने ७.४३ एकर जमीन २०० कोटी रुपयांना खरेदी केली. याचबरोबर कासाग्रँडने २.८ एकर जमीन ६० कोटी रुपयांना खरेदी केली. या दोन्ही कंपन्यांकडून तिथे निवासी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
sanjay.jadhav@expressindia.com
