पुणे : दस्तनोंदणीमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर रोखण्यासंदर्भात राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने कार्यप्रणाली निश्चित केली असून, त्या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतला जाणार आहे. बनावट कागदपत्रांसंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन दुय्यम निबंधकांविरोधात प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करण्यात येणार आहे.

दस्तनोंदणीमध्ये बनावट कागपत्रांचा वापर रोखण्यासंदर्भात नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या महानिरीक्षकांनी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्तनोंदणी करून घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्या पक्षकारांविरुद्ध दुय्यम निबंधक त्यांच्या अधिकारातून फौजदारी तक्रार दाखल करू शकणार आहेत.

याशिवाय, सहजिल्हा निबंधक कार्यालयाने अधिनस्त दुय्यम निबंधकांना नोंदणीसाठी दाखल करण्यात ‘रेरा’ प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्राची पडताळणी करून नंतरच दस्तनोंदणी करावी, अशी सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्तनोंदणी केल्याच्या संदर्भातील तक्रारींची यादी करून त्या अनुषंगाने बांधकाम परवानगी प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, अकृषिक आदेश, रेरा प्रमाणपत्र, मंजूर नकाशा आदी कागदपत्रांची पडताळणी करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्याचा आढावा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.

या संदर्भात विलंब करणाऱ्या दुय्यम निबंधकांविरोधात प्रशासकीय कारवाईची शिफारस करण्यासंदर्भातील आदेश सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी काढले आहेत.