पुणे : ऐन मे महिन्यात यंदा पावसाळ्याचा अनुभव पुणेकरांना मिळत आहे. मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाचा जोर सायंकाळनंतर वाढून शहर आणि परिसरातील काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शिवाजीनगर रात्री साडेआठपर्यंत २३.६ मिमी, तर रात्री १० वाजेपर्यंत चिंचवड येथे ९३.५ मिमी पावसाची नोंद झाली.
गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात सातत्याने पाऊस पडत आहे. सोमवारी शहर आणि उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर, कोथरूड, कात्रज, विमाननगर, पाषाण, मध्यवर्ती पेठांच्या परिसरात सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. रात्री साडेआठच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाची तीव्रता वाढली. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. कामासाठी बाहेर पडलेल्या, घरी परतणाऱ्या नागरिकांची जोरदार सरींमुळे गैरसोय झाली.
शिवाजीनगर रात्री साडेआठपर्यंत २३.६ मिमी, तर रात्री १० वाजेपर्यंत चिंचवड येथे ९३.५ मिमी, हडपसर ६७.५ मिमी, लवळे ३४.२ मिमी, वडगाव शेरी ५८.५, तळेगाव ४० मिमी, कोरेगाव पार्क येथे ९ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील काही दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २६ मेपर्यंत शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषत: घाट परिसरात पावसाचा जोर राहू शकतो. वादळी वारे, विजा, कमी दृश्यमानता, सखल भागात पाणी साचणे, झाडांच्या फांद्या तुटण्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.- अनुपम कश्यपी, निवृत्त हवामानशास्त्रज्ञ