पुणे : पुण्यात फेब्रुवारी महिन्यात १४ हजार २८४ घरांची विक्री झाली आहे. मागील महिन्यात एकूण ८ हजार ८९६ कोटी रुपयांच्या मालमत्तांची नोंदणी झाली आहे. यात परवडणाऱ्या घरांची संख्या सर्वाधिक ४६ टक्के आहे. यामुळे त्यांच्याकडे पुणेकरांचा ओढा असल्याचे दिसून आले आहे. मोठ्या घरांच्या विक्रीतही वाढ होत असून, त्यांचे प्रमाण २८ टक्क्यांवर पोहोचले आहे.
नाईट फ्रँक इंडियाने पुणे जिल्ह्यातील फेब्रुवारी महिन्यातील मालमत्ता नोंदणीचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, मागील वर्षी फेबुवारी महिन्यात परवडणाऱ्या घरांची (५० लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या) विक्री ४३ टक्के होती. त्यात यंदा फेब्रुवारी महिन्यात ती ४६ टक्क्यांवर पोहोचली आहे. याचवेळी मोठ्या मालमत्ता म्हणजेच आठशे चौरस फुटांवरील घरांची विक्री २८ टक्क्यांवर गेली आहे.
फेब्रुवारी महिन्यात एकूण ८ हजार ८९६ कोटी रुपयांच्या मालमत्तांची नोंदणी झाली. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा आकडा ६ हजार ४४० कोटी रुपये होता. त्यात आता ४० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. एकूण मालमत्ता नोंदणीत १७ टक्के आणि नोंदणी झालेल्या मालमत्तेच्या एकूण मूल्यात १६ टक्के वाढ झालेली आहे. याचवेळी मुद्रांक शुल्कात १७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
२५ ते ५० लाखांच्या घरांना मागणी
फेब्रुवारी महिन्यात २५ ते २५ लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांना मोठी मागणी दिसून आली. एकूण नोंदणीमध्ये त्यांचे प्रमाण ३६ टक्के असून, मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ते ३ टक्क्याने कमी आहे. याचबरोबर ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण एकूण विक्रीत ३५ टक्के आहे. याचवेळी ५० लाख रुपयांवरील घरांचे प्रमाण एकूण विक्रीत ४६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
पाचशे ते आठशे चौरस फुटांचा घरांना प्राधान्य
पुण्यात फेब्रुवारी महिन्यात विक्री झालेली जवळपास निम्मी घरे ही पाचशे ते आठशे चौरस फुटांची आहेत. त्यांचा एकूण विक्रीत हिस्सा ४७ टक्के आहे. याचवेळी ५०० चौरस फुटांपेक्षा छोट्या घरांच्या विक्रीचे प्रमाण २५ टक्के आहे. तसेच आठशे फुटांपेक्षा मोठ्या घरांचे प्रमाण २८ टक्के आहे.
व्याजदर वाढत असूनही पुण्यातील निवासी मालमत्तांची बाजारपेठ पूर्वपदावर येत आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात सातत्याने झालेली वाढ आणि मेट्रो उपकर असूनही घरांची विक्री वाढत आहे. शहरातील पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणात सुरू असून, रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. यातून गृहनिर्माण क्षेत्राला पाठबळ मिळणार आहे.
– शिशिर बैजल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नाईट फ्रँक इंडिया