पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्रातील नऊ उड्डाणपुलांचा लोकार्पण सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर पार पडला. नितीन गडकरी या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आला होता. एक हजार नागरिकांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. पण साडेतीन वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शहरातील नागरिकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. आयोजकांवर प्रशिक्षणार्थ महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलविण्याची वेळ आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाच वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीमधून उतरताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कार्यक्रमाबाबत माहिती सांगत होते. त्यावेळी ऑनलाइन कार्यक्रम घेतला असता तर बरं झालं असतं, असे मत एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडले.