पुणे : धरणक्षेत्रात दमदार पावसाचे पुनरागमन; पाणीसाठा ७६ टक्क्यांवर

काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुनरागमन केले आहे.

पुणे : धरणक्षेत्रात दमदार पावसाचे पुनरागमन; पाणीसाठा ७६ टक्क्यांवर
खडकवासला धरण(संग्रहीत छायाचित्र)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुनरागमन केले आहे. मंगळवारी सकाळपर्यंत चारही धरणांच्या परिसरात संततधार पावसाने हजेरी लावली. सध्या धरणांमधील पाणीसाठा २२.३८ अब्ज घनफूट (टीएमसी) ७६.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात १२५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ७६ मि.मी, पानशेत धरण परिसरात ७५ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात सहा मि.मी. पाऊस पडला. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात २२.३८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवारी रात्री चारही धरणांत २१.५४ टीएमसी पाणीसाठा होता. सोमवारी रात्रीच्या तुलनेत मंगळवारी सकाळी ०.८४ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चारही धरणांत पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठा ४२ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे या धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. आतापर्यंत या धरणातून ३.३४ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सध्या नवीन मुठा कालव्यातून १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत –

टेमघर                   २.२७      ६१.६३
वरसगाव               १०.०३    ७८.२३
पानशेत                 ९.२४      ८६.७८
खडकवासला        ०.८४      ४२.३३
एकूण                   २२.३८    ७६.७७

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune return of heavy rains in dam area water storage at 76 percent pune print news msr

Next Story
पुणे : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत शहरात वितरणसाठी मागविलेल्या पाच लाख झेंड्यांपैकी चार लाख झेंडे निकृष्ट
फोटो गॅलरी