शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या दुचाकी टॅक्सीवर बंदी घालण्याच्या प्रमुख मागणीसाठी शहरातील रिक्षा संघटनांनी सोमवारी (२८ नोव्हेंबर) मोठ्या संख्येने मोर्चा काढून बंद पुकारला. शहरातील बहुतांश रिक्षा बंद राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. रिक्षा चालकांच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय होईपर्यंत बंद कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलनात सहभागी रिक्षा संघटनांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा- निधीअभावी पुणे जिल्हा परिषदेच्या अत्याधुनिक अभिलेख कक्षाचे काम रखडले

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे

शहरात ओला, उबरसह गेल्या काही दिवसांपासून ॲपच्या माध्यामातून दुचाकी टॅक्सीही सुरू करण्यात आली आहे. रिक्षा संघटनांकडून त्याला तीव्र विरोध करण्यात आला आहे. रिक्षा चालकांचा व्यवसाय हिरावून घेणारी ही अनधिकृत प्रवासी वाहतूक बंद करावी, अशा मागणाचे निवेदन स्थानिक प्रशासन आणि राज्य शासनालाही देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास बंद पुकारण्याचा इशाराही यापूर्वी देण्यात आला होता. दरम्यानच्या काळात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी टॅक्सी चालविणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल केला. मात्र, त्यास तातडीने बंदी घालावी, या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये शहरातील सुमारे १२ ते १५ रिक्षा संघटना सहभागी झाल्या आहेत. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालील रिक्षा पंचायतीचा मात्र त्यात सहभाग नाही.

शहरातील विविध रिक्षा संघटनांनी सोमवारी सकाळी ११ वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयावर रिक्षासह मोर्चा काढला. वेगवेगळ्या भागातून रिक्षा चालक या परिसरात जमा झाले. त्यामुळे आरटीओ कार्यालयापासून वाकडेवाडीपर्यंत सकाळी रिक्षाच्या रांगा लागल्या होत्या. दुचाकी टॅक्सी बंद करण्याबाबत या ठिकाणी जोरदार घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, बघतोय रिक्षावाला फोरमचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी रिक्षा चालकांना मार्गदर्शन केले. रिक्षा चालकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. संध्याकाळी उशिरापर्यंत बहुतांश रिक्षाचालक आरटीओजवळ निदर्शने करीत होते.

हेही वाचा- पिंपरीत उपोषणाला बसलेले कामगार रुग्णालयात दाखल

बस थांब्यांवर प्रवाशांची गर्दी

रिक्षा बंदमध्ये शहरातील बहुतांश रिक्षा संघटनांनी सहभाग घेतला होता. काही रिक्षा संघटना बंदमध्ये सहभागी नसल्या, तरी दुपारपर्यंत शहरातील जवळपास सर्वच रिक्षा बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानकांच्या परिसरात रिक्षा उपलब्ध न झाल्याने रस्त्यालगत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. रिक्षा उपलब्ध होत नसल्याने अनेक प्रवाशांनी पीएमपी बसकडे मोर्चा वळविल्याने शहरातील पीएमपी बस थांब्यावरही गर्दी दिसून येत होती.

शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या दुचाकी टॅक्सीवर बंदी घालण्याची आमची प्रमुख मागणी आहे. शहरातील विविध संघटनांनी बंद पुकारला आहे. बंदमुळे मुख्यमंत्र्यांच्या वतीने रिक्षा संघटनांशी संपर्क करण्यात आला आहे. मात्र, सकारात्मक कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. मागणीबाबत ठोस निर्णय होईपर्यंत बंद सुरूच ठेवण्याचा आमचा निर्धार असल्याचे बघतोय रिक्षावाला फोरम संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.

हेही वाचा- पुणे: हिंजवडी, वाकडमधील दोन वेगवेगळ्या प्रकरणात २८ लाख रूपयांची ऑनलाइन फसवणूक

बंदमध्ये सहभागी संघटना

महाराष्ट्र रिक्षा पंचायत, बघतोय रिक्षावाला फोरम, आम आदमी रिक्षाचालक संघटना पुणे शहर (जिल्हा), वाहतूक सेवा संघटना, शिवनेरी रिक्षा संघटना, अजिंक्य रिक्षा संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, आरपीआय रिक्षा वाहतूक आघाडी, आशीर्वाद रिक्षा संघटना, एआयएमआयएम रिक्षाचालक संघटना, शिवा वाहतूक संघटना, राष्ट्रीय एकता रिक्षा महासंघ.