पुणे : रिक्षाचालकाने प्रवासी तरुणाला धमकावून रोकड, मोबाइल संच असा २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना बंडगार्डन मेट्रो स्थानक परिसरात घडली. याबाबत एका तरुणाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रिक्षाचालकसह दोन साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १९ वर्षीय तरुण मूळचा बिहारचा आहे. तरुण आणि तिचा मित्र पुणे रेल्वे स्थानक परिसरात उतरले.
गुरुवारी (२२ जानेवारी) पहाटे सव्वापाचच्या सुमारास तरुण आणि त्याचा मित्र रिक्षातून बंडगार्डन रस्त्याने निघाले होते. बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळ रिक्षाचालकाने रिक्षा थांबविली. रिक्षाचालक आणि साथीदारांनी तरुणआणि त्याच्या बरोबर असलेल्या मित्राला धमकाविले. त्यांच्याकडील साडेतीन हजारांची रोकड, मोबाइल संच असा ऐवज लुटून रिक्षाचालक पसार झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस कर्मचारी जढर तपास करत आहेत. –
बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू
भरधाव बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील वैदुवाडी परिसरात घडली. या प्रकरणी बसचालकाला अटक करण्यात आली. राजा यल्लाप्पा लाकडे (वय ३०, रा. हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बसचालक अमालया अयप्पा किरयाल (वय ५८, रा. गंगानगर, शहापूर, कर्नाटक) याला अटक करण्यात आली. याबाबत पूजा यल्लाप्पा लाकडे (वय ५०, रा. हडपसर) यांनी वानवडी पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा लाकडे हे १९ जानेवारी रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्याने निघाले होते. हडपसर परिसरातील वैदुवाडी परिसरात भरधाव बसने रस्ता ओलांडणाऱ्या लाकडे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या लाकडे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे तपास करत आहेत.
