पुणे : महागाईच्या वाढत्या झळांमुळे त्रस्त असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आता रिक्षा प्रवासासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) रिक्षा भाडेवाढीला मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली ‘आरटीए’ची बैठक झाली. या बैठकीत रिक्षाच्या भाडेवाढीबाबत चर्चा करण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) अद्याप भाडेवाढ जाहीर करण्यात आलेली नाही. येत्या दोन दिवसात नवीन भाडे दर जाहीर करणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले.
रिक्षाचे जून दर काय आहेत ?
पुण्यात पहिल्या १.५ किलोमीटर प्रवासातही २५ रुपये आणि त्यानंतर १७ रुपये प्रती किलोमीटर असा दर आकारण्यात येतो. आता मात्र नवीन दरानुसार हे भाडे वाढणार असल्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी करण्यात येत होती. सीएनजीच्या किमतीत झालेली मोठी वाढ, वाहनांच्या सुट्या भागांचे वाढलेले दर, विमा, देखभाल आणि दुरुस्तीवरील वाढता खर्च तसेच सर्वसाधारण महागाईमुळे सध्याच्या भाडेदरात व्यवसाय करणे परवडत नसल्याचे संघटनांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर ‘आरटीए’च्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रिक्षांचा मोठा वाटा आहे. पुणे शहर आणि परिसरात साधारण दीड लाखांच्या आसपास रिक्षा धावतात. त्यामुळे दररोज लाखो प्रवासी रिक्षाने प्रवास करतात. रिक्षाच्या भाडेवाढीचा सर्वाधिक फटका दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. शाळा, कॉलेज, कार्यालयात जाण्यासाठी रिक्षेचा वापर करणाऱ्यांचा मासिक खर्च वाढणार आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून कोणतीही भाडेवाढ न झाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असल्याचीही भावना व्यक्त करण्यात येत आहे.
‘आरटीए’ची बैठक चांगली झाली. या बैठकीत पुण्यातील वाहतुकीसंदर्भात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. भाडेवाढीचा निर्णय अद्याप जाहीर करण्यात आला नाही. लवकरच हा निर्णय जाहीर करण्यात येईल. – अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी
