पुणे : रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्रकल्पांसाठी एकसमान नियमावली तयार करण्यात येईल आणि तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी मे महिन्यात दिले होते. प्रत्यक्षात पुणे महापालिकेकडून आरएमसी प्रकल्पांवर थेट कारवाईचे सत्र सुरू आहे. या कारवाईवर पुणे आरएमसी असोसिएशनने आता प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी असोसिएशनने महापालिका आयुक्तांची गुरूवारी भेट घेऊन त्यांच्यासमोर याप्रकरणी भूमिका मांडली.
महापालिकेने बावधन व धायरी परिसरातील आरएमसी प्रकल्पांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईचा पुणे आरएमसी असोसिएशनने निषेध केला आहे. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर म्हणाले की, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम व इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरएमसी उद्योगाबाबत मे महिन्यात बैठक झाली होती. त्यावेळी आरएमसी उद्योगासाठीची एकसमान नियमावली निश्चित करून तिची अंमलबजावणी होईपर्यंत प्रकल्पांवर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. या बैठकीला सहा महिने झाले असून अद्याप ही नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही. असे असताना थेट आरएमसी प्रकल्प पाडण्याची कारवाई महापालिकेने केली आहे.
आरएमसी प्रकल्पांमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक असते. प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे या उद्योगासमोर संकट निर्माण झाले आहे. आरएमसी उद्योग हा पुण्याच्या पायाभूत सुविधा विकासाचा महत्त्वाचा घटक आहे. या उद्योगातून हजारो कामगारांना व त्यांच्या कुटुंबांना रोजगार व उपजीविकेचा आधार मिळतो. अचानक होणाऱ्या कारवाया आणि नियमांबाबतची अनिश्चितता यामुळे उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि कामगारांच्या रोजगारावरही संकट निर्माण होऊ शकते. याचबरोबर पुण्यातील गृहनिर्माण क्षेत्रासह पायाभूत सुविधा प्रकल्पांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असे वाल्हेकर यांनी सांगितले.
आरएमसी असोसिएशनच्या मागण्या
- आरएमसी उद्योगासाठीची एकसमान नियमावली तातडीने जाहीर करावी.
- बावधन व धायरी येथील आरएमसी प्रकल्पांवरील कारवाईची चौकशी व्हावी.
- आरएमसी प्रकल्पात त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्याची संधी द्यावी.
- प्रशासकीय यंत्रणा आणि आरएमसी उद्योगाच्या प्रतिनिधींची तातडीने संयुक्त बैठक घ्यावी.
- उद्योगाच्या व्यावहारिक अडचणींचा विचार करून नियम निश्चित करावेत.
प्रकल्प पाडण्याची कारवाई नको
आरएमसी प्रकल्प थेट पाडण्याची कारवाई करण्यात आली असून, ती तातडीने थांबवावी, अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना भेटून करण्यात आली आहे. एखाद्या प्रकल्पाने नियमभंग केल्यास तो पाडण्याऐवजी बंद करण्याची कारवाई करून सुधारणा करण्यास संधी द्यायला हवी. याचबरोबर शासकीय यंत्रणांची एकसमान नियमावली आरएमसी उद्योगाशी चर्चा करून तातडीने लागू करावी, अशा आमच्या मागण्या आहेत. आयुक्तांनी यावर सकारात्मक भूमिका घेतली असून, थेट प्रकल्प पाडण्याची कारवाई न कऱण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे प्रदीप वाल्हेकर यांनी स्पष्ट केले.
