पुणे : रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयातून आरएमसी प्रकल्पांसाठी तात्पुरती नियमावली लागू केली. मात्र, या नियमावलीचा भंग मोठ्या आरएमसी कंपन्यांकडून सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पुणे आरएमसी असोसिएशनच्या हेल्पलाईनवर या महिन्यात नियमभंगाच्या २५ तक्रारी आल्या आहेत. यावर असोसिएशननेच आता कठोर भूमिका घेत या कंपन्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

आरएमसी प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभरात या प्रकल्पांसाठी नवीन नियमावली गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लागू केली. या नियमावलीच्या अंमलबजावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अडसर निर्माण झाला होता. त्यामुळे पुण्यातील आरएमसी चालकांनी आंदोलनाचे पाऊल उचलून उत्पादन बंद केले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सर्व शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत आरएमसीसाठी तात्पुरती नियमावली निश्चित करण्यात आली. त्यानंतर आरएमसी प्रकल्पांचे उत्पादन पुन्हा सुरू झाले.

शहरात सुमारे ३५० आरएमसी प्रकल्प आहेत. त्यातील काही आरएमसी कंपन्या नियमांचा भंग करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. पुणे आरएमसी असोसिएशनच्या हेल्पलाईन क्रमांकावर या महिन्यात नागरिकांडून आरएमसीविरोधात २५ तक्रारी आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने मोठ्या आरएमसी कंपन्यांच्या विरोधातील तक्रारींचा समावेश आहे. स्थानिक यंत्रणांनी निश्चित केलेल्या वेळेत काँक्रीट पुरवठा न करता रात्रीच्या वेळेत या कंपन्या पुरवठा करीत आहेत. तसेच, प्रदूषण नियमांचे उल्लंघन त्यांच्याकडून होत आहे. या कंपन्यांनी धूळ नियंत्रणासाठी यंत्रणा बसविलेली नसून, वाहतूक निर्बंधांचे पालन त्यांच्याकडून होत नाही, अशी माहिती पुणे आरएमसी असोसिएशनने दिली.

तक्रारींसाठी हेल्पलाईन

  • हेल्पलाईन क्रमांक : ९९२२३४०३४०
  • ई-मेल : punermcasso@gmail.com

आरएमसी पुरवठ्यासाठी वेळा

  • सोमवार, मंगळवार, गुरूवार, शुक्रवार – सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत
  • बुधवार, शनिवार, रविवार – सकाळी ६ ते सायंकाळी ५ पर्यंत

तक्रारी नेमक्या काय?

  • रात्रीच्या वेळेत काँक्रीट पुरवठा
  • वेळेच्या नियमांचे उल्लंघन
  • धूळ प्रदूषण व रस्त्यावर काँक्रीट, माती सांडणे
  • आरएमसी वाहनांमुळे वाहतूक अडथळे
  • प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन

आरएमसी कंपनी कितीही मोठी असली तरी ती शासनाच्या नियमांपेक्षा मोठी नाही. पर्यावरणीय नियम, वाहतूक निर्बंध, सार्वजनिक सुरक्षितता आणि प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कंपनीला आमचा पाठिंबा नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर शासकीय यंत्रणांनी तत्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. – प्रदीप वाल्हेकर, अध्यक्ष, पुणे आरएमसी असोसिएशन

आरएमसी प्रकल्पांकडून नियमांचे पालन केले जाते की नाही, याची तपासणी सुरू आहे. यात दोषी आढळणाऱ्या आरएमसी प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जात आहे. आरएमसी प्रकल्पांच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर त्यांची तातडीने दखल घेतली जात आहे. पुण्यातील आरएमसी प्रकल्पांसाठी एकसमान नियमावली तयार करण्याबाबत पावले उचलण्यात आली आहेत. -बाबासाहेब कुकडे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ